साखळी : हरवळे-साखळी येथील दिनकरनगर भागातील वस्तीत गव्याचे दर्शन झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच वन खात्याने पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गव्याला हरवळे येथील जंगलभागात हाकलून लावण्यात यश मिळवले.
साखळी ते वाळपई या मार्गावर हरवळे येथे दिनकरनगर या भागात मंगळवार, दि. २२ रोजी दुपारी २.३० वाजता सर्वप्रथम एका स्थानिक व्यक्तीला हा गवा दिसला. रस्ता ओलांडताना गव्याला पाहून तो इसम दचकून थांबला. त्याच वेळी गवादेखील थांबला आणि दचकून झाडीत गेला; मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा रस्त्यावर आला. तो रस्त्यावर येताच संबंधित व्यक्तीने स्थानिक समाजसेवक गीतेश माडकर यांना याची कल्पना दिली. माडकर यांनी तत्काळ वन खात्याला माहिती दिली.
वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हरवळे येथे येऊन गव्याला पिटाळून लावण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र गव्याने कर्मचाऱ्यांची दमछाक केली. हरवळे येथील गणेश विद्यालयाच्या मागील परिसरात ठाण मांडलेला गवा ती जागा सोडायला तयार नव्हता. अखेर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६.३० वाजता गव्याला जंगलात पिटाळण्यात यश मिळवले. या कामात त्यांना स्थानिक युवकांनीही सहकार्य केले.


