आता गोव्यात ग्राहकांना वजन तपासण्याची सुविधा

नव्या नियमांनुसार कमी जोखमीच्या वजन-माप यंत्रांसाठी स्व-प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र अशा यंत्रांची सुरुवातीची तपासणी वनजमाप खाते किंवा अधिकृत तृतीय-पक्ष संस्थेकडून करणे बंधनकारक असेल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने स्व-प्रमाणीकरण करता येईल.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd September, 11:31 pm
आता गोव्यात ग्राहकांना वजन तपासण्याची सुविधा

पणजी : गोवा सरकारने गोवा वजनमाप नियम २०२६ अधिसूचित केले असून वजन-माप यंत्रांच्या वापरासह उत्पादक, विक्रेते व दुरुस्तीदारांसाठी नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. हे नियम अंतिम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर लागू होतील. नव्या नियमांनुसार कमी जोखमीच्या वजन-माप यंत्रांसाठी स्व-प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र अशा यंत्रांची सुरुवातीची तपासणी वनजमाप खाते किंवा अधिकृत तृतीय-पक्ष संस्थेकडून करणे बंधनकारक असेल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने स्व-प्रमाणीकरण करता येईल.
व्यापाऱ्यांना प्रत्येक व्यवहारासाठी वस्तूचे प्रमाण, वजन आणि आकारलेली रक्कम नमूद असलेली पावती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅकेज्ड वस्तूंची विक्री करणाऱ्या जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांना ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा उपलब्ध ठेवावा लागणार असून त्यावर वजन तपासण्याची सुविधा विनामूल्य द्यावी लागेल.
दरम्यान, मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या कामकाजात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी प्रशासनाने नियमावली अधिक कडक केली आहे. चुकीची माहिती देणे, न तपासलेल्या वजने व मापांवर मान्यतादर्शक शिक्के मारणे, किंवा कायदेशीर मानकांचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित केंद्राचे मान्यता प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द केले जाईल, असा इशारा गोवा सरकारने दिला आहे.

दंडाची तरतूद

सोने-चांदीच्या व्यवहारात पावतीवर सोन्याची शुद्धता ‘कॅरेट’मध्ये, निव्वळ वजन आणि किंमत नमूद करावी लागेल. नियमभंगासाठी किमान २ हजार ते कमाल २५ हजार रुपये दंड, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी ५० हजार आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा