ऐन चतुर्थीच्या सणात गांजे-उसगाव पाण्याविना

गांजे येथे गेल्या ८-१० दिवसांपासून स्थानिक लोकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त लोकांनी मंगळवारी संध्याकाळी एकत्र येऊन पत्रकारांसमोर व्यथा व्यक्त केली. बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नवीन बांधलेला जलशुद्धीकरण प्रकल्प बंद करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Story: गोवन वार्ता प्रतिनिधी |
22nd September, 11:27 pm
ऐन चतुर्थीच्या सणात गांजे-उसगाव पाण्याविना

फोंडा : गांजे-उसगाव येथील म्हादई नदी आणि नवीन बांधलेल्या २५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ असलेल्या गावातील नळ गेल्या ८-१० दिवसांपासून कोरडे पडले आहेत. ऐन चतुर्थीच्या दिवसांत स्थानिकांना झरीच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नवीन बांधलेला जलशुद्धीकरण प्रकल्प बंद करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
गांजे येथे गेल्या ८-१० दिवसांपासून स्थानिक लोकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त लोकांनी मंगळवारी संध्याकाळी एकत्र येऊन पत्रकारांसमोर व्यथा व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याने गावात बांधलेला नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झाल्यानंतर २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून जलशुद्धीकरण प्रकल्पातून प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, चतुर्थीच्या दिवसापासून नळातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे स्थानिक लोकांना अंदाजे ३००-४०० मीटर अंतरावर असलेल्या झरीचे पाणी वापरावे लागत आहे. संतप्त लोकांनी बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नव्याने बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
नव्याने बांधण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केल्यानंतर २४ तास पाणीपुरवठा करण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे स्थानिक पंच सदस्य नरेंद्र गावकर यांनी सांगितले. चतुर्थीपासून आतापर्यंत स्थानिक लोकांना नळाचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. यासंबंधीची माहिती बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती, परंतु अद्याप दुरुस्तीचे काम न केल्याने संतप्त नागरिक ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास जलशुद्धीकरण प्रकल्प बंद करून गेटला टाळे ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा