श्रीनिवास नायक यांना संरक्षण, पायलट वाहन देण्यास पोलिसांचा नाकार

पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांनी पोलीस संरक्षण आणि पायलट वाहने देण्याची मागणी केली होती. ही मागणी पोलिसांनी नाकारली आहे; मात्र त्यांच्या राहत्या घरी आणि त्यांच्यासोबत सशस्त्र पोलीस नियुक्त करण्यात आला आहे.

just now
श्रीनिवास नायक यांना संरक्षण, पायलट वाहन देण्यास पोलिसांचा नाकार

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांनी पोलीस संरक्षण आणि पायलट वाहने देण्याची मागणी केली होती. ही मागणी पोलिसांनी नाकारली आहे; मात्र त्यांच्या राहत्या घरी आणि त्यांच्यासोबत सशस्त्र पोलीस नियुक्त करण्यात आला आहे.
श्रीनिवास नायक यांच्यावर २८ रोजी दोघांनी गोळीबार केला होता. त्यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकाने प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर नायक यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ नये म्हणून सुरक्षेसाठी पोलीस तैनात केले आहेत. तपासासाठी पोलिसांनी त्यांच्या सुरक्षारक्षकांची पिस्तुल जप्त केली होती. त्यानंतर नायक यांनी पोलीस संरक्षण आणि पायलट वाहने देण्याची मागणी केली होती. यातील पायलट आणि एस्कॉर्ट वाहने पुरविण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र नायक यांना त्यांच्यासोबत आणि घरी पोलिसांची व्यवस्था केली आहे.
राज्यात सुरक्षाव्यवस्था राज्यपाल, मुख्यमंत्री आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींना देण्यात येते. इतर व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याची आवश्यकता असल्यास सुरक्षा आढावा समिती निर्णय घेते. या समितीचे अध्यक्ष म्हणून पोलीस महानिरीक्षक, तर गृह सचिव, गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी, विशेष विभागाचे आणि जिल्ह्याचे अधीक्षक सदस्य असतात. दर तीन महिन्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. दरम्यान, नायक यांच्या मागणीवर ही समितीच निर्णय घेणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.