पणजी : कालव्याच्या दुरुस्तीसाठी तिळारीचे पाणी बंद झाल्यावर आवश्यक त्या पाण्याची व्यवस्था आमठाणे धरणातून केली जाईल, अशी माहिती जलपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. तिळारीवरून बार्देश आणि डिचोली तालुक्याला पाणीपुरवठा होतो. तिळारीचे पाणी बंद झाल्यावर १२५ एमएलडी अतिरिक्त पाण्याची सोय आमठाणे धरणातून करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कालव्यांच्या दुरुस्तीसाठी गोव्यात तिळारी धरणातून येणारे पाणी बंद राहील. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हे पाणी बंद असणार आहे. यामुळे राज्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते; मात्र पाण्याची टंचाई भासू नये म्हणून योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे, असे जलपुरवठा खात्याचे मुख्य अभियंता डी. वाय. सालेलकर यांनी सांगितले.
कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तिळारीचे पाणी बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला जाईल. तिळारीचे पाणी बंद झाले तरी खात्याने पर्यायी व्यवस्था केली आहे.
पर्वरीसह बार्देश आणि डिचोली तालुक्याला अस्नोडा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तिळारीचे पाणी अस्नोडा प्रकल्पात येते. बार्देश आणि डिचोलीची गरज भागवण्यासाठी आमठाणे धरणातील १२५ एमएलडी पाणी अस्नोडा प्रकल्पात सोडले जाईल. साळ येथे पाणी पंप करण्याची यंत्रणा तयार आहे. साळ आणि आमठाणे धरणातून पाण्याची व्यवस्था होईल. साळ येथून ७५ एमएलडी पाणी उपसणे सहज शक्य आहे, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.
पेडणे येथेसुद्धा तिळारीचे पाणी जाते. पेडणे येथे ३० एमएलडीचा प्रकल्प आहे. यातून पेडणेची गरज भागेल.
कालव्यांच्या दुरुस्तीचे आधीपासूनच नियोजन
डिसेंबरपर्यंत तरी पाण्याची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. राज्यात ६७० एमएलडी पाण्याची गरज आहे. तिसवाडी तालुक्यात ओपा प्रकल्पातून पाणी येते; त्यामुळे तिळारीचे पाणी तिसवाडी तालुक्यात जात नाही. बार्देश, डिचोली आणि पेडणेच्या काही भागात तिळारीवरून येणाऱ्या पाण्याचा वापर होतो. तिळारीच्या कालव्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने खात्याने आधीपासूनच नियोजन केले आहे, अशी माहिती मिळाली आहे.


