पर्वरी फ्लायओव्हर; एक्झिटनंतर एंट्री लवकरच होणार खुली

अटलसेतूची एक लेन पर्वरी एक्झिटसाठी खुली केल्यानंतर लवकरच पर्वरीहून उड्डाणपुलावर जाण्यासाठी एंट्रीही खुली केली जाणार आहे. वाहतुकीचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.


1 hours ago
पर्वरी फ्लायओव्हर; एक्झिटनंतर एंट्री लवकरच होणार खुली

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
अटलसेतूची एक लेन पर्वरी एक्झिटसाठी खुली केल्यानंतर लवकरच पर्वरीहून उड्डाणपुलावर जाण्यासाठी एंट्रीही खुली केली जाणार आहे. वाहतुकीचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली. अटल सेतूवरून पर्वरी, म्हापशाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल निओ मॅजेस्टिकजवळ 'एक्झिट' अधिकृतपणे खुली केल्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उड्डाणपुलावर रम्बलर तसेच सूचना फलक बसविण्याचे काम सुरू आहे. आवश्यक उपाययोजना केल्यानंतर पर्वरीहून उड्डाणपुलावर जाण्यासाठी एंट्री खुली केली जाईल. सध्या केवळ एक्झिट खुली करण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेऊन दोन दिवसांत एंट्रीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिरवईकर यांनी दिली. अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशी बाजूकडून पर्वरी किंवा कळंगूटच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी व इतर सर्व वाहनांना (दुचाकी वाहने वगळून) अटल सेतूचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नव्या वाहतूक आराखड्यानुसार अटल सेतूवरील उपलब्ध तीनपैकी डाव्या बाजूची एक लेन केवळ पर्वरी शहरात आणि सर्व्हिस रोडवर प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी राखीव ठेवली आहे. यामुळे मेरशी आणि पणजीकडून येणारी वाहने मुख्य महामार्गावरील गर्दीत न अडकता थेट पर्वरीच्या दिशेने खाली उतरू शकतील. परंतु, ही व्यवस्था केवळ पर्वरीत उतरण्यासाठी मर्यादित असून, सर्व्हिस रोडवरून अटल सेतूवर चढण्याचा मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आला आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना, वेगावर नियंत्रणाचे आव्हान
नवीन तोडग्यामुळे मुख्य महामार्गावरील कोंडी काही प्रमाणात हलकी होण्यास मदत होणार असली, तरी उड्डाणपुलावरून वाहने वेगाने खाली उतरत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या सुरक्षेच्या आव्हानावर मात करण्यासाठी प्रशासनाने या एक्झिट पॉईंटवर रंबलर्स बसवले आहेत आणि बॅरिकेड्सच्या साहाय्याने हा मार्ग मुख्य वाहतुकीपासून वेगळा केला आहे. याशिवाय, वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.