गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची गोवा भाजपच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनिल अँटोनी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या नियुक्तीबद्दल दोघांचेही अभिनंदन केले.

भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी दोघांच्या नियुक्तीची घोषणा केली. गोव्यात भाजपचे संघटनात्मक काम वाढवण्यासाठी दोन्ही नेत्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. संघटना मजबूत करण्यासोबतच जनसंपर्क वाढवण्यासही त्यांची मदत होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले. माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनीही डॉ. भारती पवार यांच्या प्रभारीपदी नियुक्तीचे स्वागत केले.

तानावडे महाराष्ट्राचे सहप्रभारी
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांची महाराष्ट्राच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अनुभव आणि संघटन कौशल्य महाराष्ट्रातील भाजपचे काम वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.


