चतुर्थीच्या काळात ‘कदंब’च्या तिजोरीत ६० लाखांची भर

नियमित ७८ बसेसव्यतिरिक्त कदंबने अतिरिक्त ३० बसेस सुरू केल्या होत्या. यामध्ये मुंबई सेंट्रल, मुंबई बोरिवली, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, शिर्डी, गणपतीपुळे, अक्कलकोट, सोलापूर, कोल्हापूर, आदमापूर, विजयदुर्ग, मिरज, म्हैसूर, शहापूर, कलबुर्गी, मुद्देबिहाळ, इंडी, होस्पेट, बदामी, हुबळी, बेळगाव, सावंतवाडी, कारवार, वेंगुर्ला, मालवण आणि घोडेवाडी यांसारख्या विविध आंतरराज्यीय मार्गांवर ९,००० पेक्षा जास्त प्रवाशांना सेवा दिली.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
चतुर्थीच्या काळात ‘कदंब’च्या तिजोरीत ६० लाखांची भर

पणजी : चतुर्थीच्या सणादरम्यान कदंब वाहतूक महामंडळाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत विशेष आंतरराज्य बस सेवा सुरू केली होती. गोव्यातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी १०८ बसेस सुरू करून त्यांच्या २२४ फेऱ्या चालवण्यात आल्या. आठ दिवसांच्या कालावधीत कदंबने ६० लाखांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.
महामंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तुयेकर बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुयेकर यांनी सांगितले की, चतुर्थीच्या सुरुवातीचे काही दिवस ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान, तसेच ५ व्या व ७ व्या दिवसाच्या विसर्जनानंतर वाढलेली मागणी लक्षात घेऊन १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत कदंबने दररोज २१४ फेऱ्या चालवल्या.
या मार्गांवर वाहतुकीसाठी एसी स्लीपर, व्होल्वो, लक्झरी आणि सेमी-लक्झरी बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. नियमित ७८ बसेसव्यतिरिक्त कदंबने अतिरिक्त ३० बसेस सुरू केल्या होत्या. यामध्ये मुंबई सेंट्रल, मुंबई बोरिवली, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, शिर्डी, गणपतीपुळे, अक्कलकोट, सोलापूर, कोल्हापूर, आदमापूर, विजयदुर्ग, मिरज, म्हैसूर, शहापूर, कलबुर्गी, मुद्देबिहाळ, इंडी, होस्पेट, बदामी, हुबळी, बेळगाव, सावंतवाडी, कारवार, वेंगुर्ला, मालवण आणि घोडेवाडी यांसारख्या विविध आंतरराज्यीय मार्गांवर ९,००० पेक्षा जास्त प्रवाशांना सेवा दिल्याची माहिती तुयेकर यांनी दिली.

नवीन ३० डिझेल बसेस येणार ताफ्यात
कदंबने नुकतीच गणपतीपुळे, आदमापूर, सोलापूर, कोल्हापूर, इंडी, शहापूर आणि पुणे यांसारख्या नवीन मार्गांवर बस सेवा सुरू केली आहे. तसेच बंगळुरू, इळकल, दावणगिरी, चिक्कोडी, मुरुडेश्वर, कोल्हापूर आणि रत्नागिरी यांसारख्या मार्गांवर सेवा देण्यासाठी कदंब आपल्या ताफ्यात आणखी सुमारे ३० नवीन डिझेल बसेसचा समावेश करणार आहे, असे तुयेकर यांनी सांगितले.

महिला बचत गटांना तात्पुरते स्टॉल्स
'स्वयंपूर्ण गोवा' या संकल्पनेला बळ देण्यासाठी कदंबने गोव्याच्या विविध गावांतील महिला बचत गटांना काणकोण, मडगाव यांसारख्या कदंब बस स्थानकांवर कोणतेही शुल्क न घेता तात्पुरते स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी दिली होती, असेही तुयेकर यांनी सांगितले.