दक्षिण कोरियावर भारताचा ८-२ असा विजय

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
24th September, 11:47 pm
दक्षिण कोरियावर भारताचा ८-२ असा विजय

नागोवा : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीच्या गट टप्प्यात भारताने दक्षिण कोरियाचा ८-२ असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. चार वेळच्या विजेत्या दक्षिण कोरियाविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला. भारताकडून अभिषेक आणि दिलप्रीत सिंह यांनी प्रत्येकी दोन गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली.
पहिल्याच क्वार्टरमध्ये ४-० आघाडी
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दक्षिण कोरियावर दबाव निर्माण केला. चौथ्या मिनिटाला शिलानंद लाकडाने गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर नवव्या मिनिटाला सुखजीत सिंह आणि ११व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंह यांनी गोल केले. १४व्या मिनिटाला अभिषेकने चौथा गोल करत पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली.
दिलप्रीत, अभिषेकची गोलांची आतषबाजी
दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंहने २६व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी ५-० केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३२व्या मिनिटाला दिलप्रीतने दुसरा गोल केला. त्यानंतर ३८व्या मिनिटाला अभिषेकने वैयक्तिक दुसरा गोल करत भारताला ७-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दक्षिण कोरियाचे दोन गोल
सात गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. किम जेहोने ४२व्या मिनिटाला, तर किम योंगबोकने ५२व्या मिनिटाला गोल केला. मात्र, भारताने सामन्यावरील पकड कायम ठेवली. अखेरच्या मिनिटाला राजिंदर सिंहने गोल करत भारताचा विजय ८-२ असा निश्चित केला.** विवेक सागर प्रसादचे २०० सामने पूर्ण
दक्षिण कोरियाविरुद्ध मैदानात उतरत भारतीय खेळाडू विवेक सागर प्रसादने वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० सामने पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. भारताच्या हॉकीसाठी ही महत्त्वपूर्ण वैयक्तिक कामगिरी ठरली.
भारताचा सलग तिसरा विजय
भारताने स्पर्धेची सुरुवात इंडोनेशियाविरुद्ध १३-१ अशा विजयाने केली. त्यानंतर श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा उडवला. आता दक्षिण कोरियाविरुद्ध ८-२ असा विजय मिळवत भारताने सलग तिसरा विजय नोंदवला. भारताचा पुढील सामना २६ सप्टेंबरला जपानविरुद्ध होणार आहे.