पणजी : कॅसिनोत ‘अंदर बाहर गेमिंग टेबल’ सुरू करून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोपाळ नाईक (कुंडई-फोंडा) याच्याविरोधात नोटीस जारी करून बुधवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र तो हजर राहिला नसल्यामुळे पुन्हा त्याला नोटीस जारी करण्यात येणार आहे.
या प्रकरणी कर्नाटकातील ललित भुराथ या व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार भुराथ यांना गोव्यातील कॅसिनो व्यवसायात स्वारस्य होते. याची माहिती मिळाल्यानंतर गोपाळ नाईक याने त्यांच्याशी संपर्क साधला. गोवा कोस्टल रिसॉर्ट्स अँड रिक्रिएशन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक अशोक वाडिया यांच्याशी आपले निकटचे संबंध असल्याचे भासवले व कॅसिनोमध्ये ‘अंदर बाहर गेमिंग टेबल’ सुरू करून देण्याची तसेच त्यातून मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याची हमी त्याने दिली. या आमिषाला भुलून नाईक याने १ डिसेंबर २०२५ रोजी भुराथ यांच्याकडून एकूण १ कोटी रुपये उकळले. मात्र, रक्कम दिल्यानंतरही ठरल्याप्रमाणे कॅसिनोमध्ये गेमिंग टेबल सुरू झाले नाही. काही दिवस वाट पाहिल्यानंतर जेव्हा तक्रारदाराने आपल्या पैशांची मागणी केली, तेव्हा संशयिताने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पणजी पोलिसात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी गोपाळ नाईक याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, नाईक हजर राहिला नसल्यामुळे त्याला पुन्हा नोटीस जारी करण्यात येणार आहे.
गोपाळ नाईक अद्याप फरार
पर्वरी गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या गोपाळ नाईकने कर्नाटकातील व्यावसायिकालाही गंडा घातल्याचे समोर आले नाहे. गोळीबार प्रकरणात गुन्हा शाखा त्याच्या मागावर आहे. तो फरार असल्याची माहिती समोर येत आहे.


