लुथरा बंधूंकडून सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज

हडफडेतील बर्च आग दुर्घटना प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
23rd September, 11:31 pm
लुथरा बंधूंकडून सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या दुर्घटनेप्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांनी म्हापसा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे.

सरकारच्या आव्हानानंतर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी लुथरा बंधूंसह अजय गुप्ता यांचा जामीन रद्द केला होता. आपोपींनी या आदेशाला दिलेली आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. तसेच त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत कनिष्ठ न्यायालयाला शरण जाणाचा आदेश दिला होता. त्यानुसार संशयित म्हापसा न्यायालयात शरण आले होते. सध्या ते कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत.

संशयितांच्यावतीने त्यांचे वकील अॅड. सौम्या ड्रॅगो यांनी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आम्ही हा नवीन जामीन अर्ज सादर केल्याची माहिती अॅड. ड्रॅगो यांनी दिली.

दरम्यान, ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमध्ये आगीची घटना घडली होती, यात २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी लुथरा बंधू, अजय गुप्ता यांच्यासह १३ जणांना अटक करत त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने वरील तिन्ही संशयितांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. राज्य सरकारने या जामीन निवाड्याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता हा जामीन रद्द केला होता. 

हेही वाचा
सर्व पहा