पणजी :‘गोवा काँग्रेस पार्टी’ या नावाची पूर्वी नोंदणी आहे की नाही याची तपासणी करून पुढील आठवड्यात माहिती द्या, असा निर्देश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ रोजी होणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘गोवा काँग्रेस पार्टी’ ची नोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यात अध्यक्ष म्हणून वेळसाव येथील फ्रान्सिस्को अंतोनियो जासिंतो गोवेया, उपाध्यक्ष म्हणून कासावली-मुरगाव येथील डायना गोवेया, मये-डिचोली येथील वामन गावकर आणि सुकूर - बार्देश येथील रोहिदास गडेकर हे पक्षाचे सरचिटणीस असल्याचे नमूद करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ (अ) अंतर्गत ‘गोवा काँग्रेस पार्टी’च्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. या संदर्भात आयोगाने जाहिरात देत हरकती मागविली होती. याला हरकत घेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आयोगाकडे हरकत दाखल केली होती. असे असताना त्यावर आयोगाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
काँग्रेसच्या हरकतींवर सुनावणी घेतल्याशिवाय ‘गोवा काँग्रेस पार्टी’ला मान्यता देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयात बुधवारी झाली असता, न्यायालयाने वरील निर्देश जारी केला.


