मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत २८ वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
23rd September, 11:31 pm
मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी सुरूच ठेवली आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात तब्बल २८ वर्षांनंतर ऐतिहासिक पदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. भारताची स्टार वेटलिफ्ट्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत रौप्य पदक आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे, मीराबाईच्या कारकिर्दीतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पदक जिंकले आहे. यापूर्वी भारताला या खेळात १९९८ मध्ये पदक मिळाले होते, जेव्हा दिग्गज कर्णम मल्लेश्वरी यांनी रौप्य पदक जिंकले होते. आता २८ वर्षांनंतर मीराबाई चानूने ही कामगिरी पुन्हा करून दाखवली आहे.
चौथ्या दिवशी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात ३२ वर्षीय मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात एकूण १९८ किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. तिने स्नॅच प्रकारात ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात १११ किलो वजन यशस्वीरित्या उचलले.
या गटात उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गम हिने उत्कृष्ट कामगिरी करत तिन्ही प्रकारांत (स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण एकूण भार) विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले. री सॉन्ग गम हिचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.
या पदकासह मीराबाई चानूने एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णम मल्लेश्वरी यांच्या नंतर, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला वेटलिफ्ट्टर ठरली आहे. तिच्या या सुवर्णयशाने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एकाच दिवसात ५ पदके
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताच्या खात्यात तब्बल ५ पदकांची भर पडली. या दिवसाची सुरुवात अत्यंत संस्मरणीय ठरली.
मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग): रौप्य पदक.
जय मीना (सॉफ्ट टेनिस): ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले.
पुरुष बॅडमिंटन संघ: उपांत्य फेरीत चीनविरुद्ध १-३ ने पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताला कांस्य पेदकावर समाधान मानावे लागले.
महिला स्कीट नेमबाज संघ: रायझा धिल्लॉन, परिनाज धालीवाल आणि माहेश्वरी चौहान या त्रिकुटाने ३३१ गुणांची कमाई करत कांस्य पदक जिंकले.
पुरुष स्कीट नेमबाज संघ: अनंतजीत सिंग नरुका, मैराज अहमद खान आणि भवतेग सिंग गिल यांनी शूट-ऑफमध्ये कझाकिस्तानचा पराभव करत कांस्य पदकाला गवसणी घातली.
मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत १८१.१ गुणांसह पाचवे स्थान मिळवले. सांघिक प्रकारातही भारतीय संघ अवघ्या काही गुणांनी पदकापासून हुकला.
रोशिबिना देवीने वूशुमध्ये निश्चित केले पदक
भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, वूशु खेळातील स्टार खेळाडू रोशिबिना देवी हिने अंतिम फेरीत धडक मारत भारतासाठी किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. महिलांच्या ६० किलो सँडा प्रकारात तिने हा पराक्रम केला आहे. सुवर्णपदकासाठी तिची अंतिम लढत चीनच्या झांग शिओयू हिच्यासोबत होणार आहे.
पदक तालिकेत भारत १३व्या स्थानी
या यशस्वी कामगिरीनंतर भारतीय संघ पदक तालिकेत १३ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडे आता एकूण १२ पदके (१ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य) जमा आहेत. या तालिकेमध्ये चीनने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे, तर १५ सुवर्णपदकांसह जपान दुसऱ्या स्थानावर आहे. खेळाडूंच्या या अद्भूत आणि प्रेरणादायी कामगिरीमुळे संपूर्ण देशाच्या नजरा आता पुढील दिवसांतील स्पर्धांवर लागल्या असून, भारतीय खेळाडू आणखी नवीन विक्रम प्रस्थापित करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.