उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास न्यायालयाची सशर्त परवानगी

निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी खटला सुरू


24th September, 11:31 pm
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास न्यायालयाची सशर्त परवानगी

मडगाव : फौजदारी खटला सुरू असलेल्या संशयिताला उच्च शिक्षणासाठी स्पेनला जाण्याची सशर्त परवानगी मडगाव प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिली. केवळ एखाद्या गुन्ह्यात संशयित असल्याच्या कारणावरून शिक्षणासाठी आवश्यक परदेश प्रवास नाकारता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायमूर्ती त्सुनामीलक्ष्मी कोळमकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. मडगाव येथील रहिवासी हेडन जोवी ट्राव्हासो यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापत केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. दरम्यान, त्यांना स्पेनमधील एस्त्रेमादुरा विद्यापीठात एक वर्षाच्या स्पॅनिश भाषेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२७ या कालावधीत स्पेनमध्ये राहून शिक्षण घेण्यासाठी तसेच या काळात न्यायालयातील प्रत्यक्ष हजेरीतून सूट मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.

संशयित परदेशात गेल्यानंतर भारतात परतणार नाही आणि खटल्याच्या सुनावणीपासून दूर राहण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी करत अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयिताची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे नमूद केले. मात्र, योग्य कारण असल्यास संशयिताला प्रत्यक्ष हजेरीतून सूट देता येते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने संशयित हेडन ट्राव्हासो याला विविध अटी घालून स्पेनला जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार पाच हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि त्याच रकमेचा एक हमीदार सादर करावा. स्पेनमधील वास्तव्याचा पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक तसेच सोबत राहणार्‍या व्यक्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागेल. प्रवासाचे संपूर्ण वेळापत्रक, विमानाची तिकिटे आणि व्हिसाची प्रत न्यायालयात जमा करावी लागेल. खटल्याच्या सुनावणीवेळी संशयिताच्यावतीने त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित राहतील. संशयित आपल्या ओळखीबाबत कोणताही वाद उपस्थित करणार नाही, याबाबत हमीपत्र द्यावे लागेल. न्यायालयाने आदेश दिल्यास संशयिताला भारतात परत येऊन न्यायालयासमोर हजर रहावे लागेल, अशा अटी घातल्या आहेत. न्यायालयाने घातलेल्या सर्व कायदेशीर अटींची पूर्तता केल्यानंतरच स्पेन प्रवासाची परवानगी लागू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

हेही वाचा
सर्व पहा