पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा मेरशी येथील सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला पुढील सुनावणीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्देश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित जेनिटो कार्दोझ याच्यासह इतरांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला होता. या आदेशाला जेनिटो कार्दोझ याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
करंझाळे येथे १८ सप्टेंबर २०२५ रोजी रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज याच्यासह अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर या आठ जणांना अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी रामा काणकोणकर यांचा जबाब नोंद केला असता, त्याला मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला. त्यानुसार, पोलिसांनी या गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडून हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे चौकशीसाठी सोपवले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेऊन जेनिटो कार्दोज याच्यासह इतरांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. या आदेशाला जेनिटोने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली असता, प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी ठेवली. तो पर्यंत सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी स्थगित ठेवण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने दिला.


