म्हापसा : अस्नोडा येथे मोटारसायकलच्या झालेल्या स्वयंअपघातातील १५ वर्षीय गंभीर जखमी रवींद्र माजिक (रा. पर्ये, सत्तरी) या दुचाकीस्वाराचे उपचारादरम्यान निधन झाले. या अपघातास कारणीभूत दुचाकी चालक शिवराज किशन सिंग (२२, रा. सिरसई व मूळ राजस्थान) याच्याविरुद्ध कोलवाळ पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अपघात मंगळवार, २२ रोजी दुपारी १.३० वाजता अस्नोडा येथील होली क्रॉस चॅपेलजवळ घडला होता. शिवराज सिंग व रवींद्र माजिक हे जीए ०३ एएस ६२७९ क्रमांकाच्या होंडा शाइन मोटारसायरकलवरून अस्नोडाहून सिरसईकडे जात होते. वाटेत घटनास्थळी नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात मागे बसलेला मुलगा रस्त्यावर कोसळला गेला. त्याच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला तत्काळ म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नंतर तिथून त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. बुधवारी सायंकाळी त्याचे उपचारादरम्यान निधन झाले.
दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद
पोलीस हवालदार हरीश रेडकर यांच्या तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी या अपघातास कारणीभूत दुचाकीस्वार संशयित शिवराज सिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ व १०६(१) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तसेच संशयिताला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर हे करीत आहेत.


