लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर २९, ३० रोजी युक्तिवाद


24th September, 11:35 pm
लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर २९, ३० रोजी युक्तिवाद

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ आग दुर्घटना प्रकरणातील क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २९ आणि ३० सप्टेंबर रोजी युक्तीवादासाठी निश्चित केली आहे.

गुरुवार, २४ रोजी न्यायालयात या अर्जावरील सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जेनिफर सांतामारिया यांनी या जामीन अर्जावर सरकार पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. त्यानंतर आरोपी आणि सरकार पक्षाचा सविस्तर आणि अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी सुनावणीची वरील तारीख निश्चित केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित आरोपी लुथरा बंधू १४ सप्टेंबर रोजी न्यायालयाला शरण आले होते. त्यांनी नंतर जामिनासाठी हा नवीन अर्ज सादर केलेला आहे. तर, अजय गुप्ता यांनी अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही.

दरम्यान, ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमध्ये ही आगीची घटना घडली होती. यात २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी लुथरा बंधू, अजय गुप्ता यांच्यासह १३ जणांना अटक करत त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने वरील तिन्ही संशयितांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. राज्य सरकारने या जामीन निवाड्याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता हा जामीन रद्द केला होता. 

हेही वाचा
सर्व पहा