रविवारी २७ सप्टेंबरला एसबीआय, पीएनबी इत्यादी ‍ सरकारी बँका राहणार सुरू

२८ ते ३० सप्टेंबरच्या बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय; ग्राहकांना व्यवहारांसाठी अतिरिक्त दिवस : सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) येत्या रविवार, २७ सप्टेंबर रोजी नियमितपणे सुरू राहणार आहेत. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित असलेल्या तीन दिवसीय देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना बँकिंग व्यवहारांसाठी अतिरिक्त दिवस उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
रविवारी २७ सप्टेंबरला एसबीआय, पीएनबी इत्यादी ‍ सरकारी बँका राहणार सुरू

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) येत्या रविवार, २७ सप्टेंबर रोजी नियमितपणे सुरू राहणार आहेत. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित असलेल्या तीन दिवसीय देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना बँकिंग व्यवहारांसाठी अतिरिक्त दिवस उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

२६ सप्टेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँकांना नियमित सुट्टी आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरला रविवारची सुट्टी आणि लगेचच २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संप असल्याने बँकिंग सेवांमध्ये सलग अनेक दिवस व्यत्यय येण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी २७ सप्टेंबर हा दिवस सरकारी बँका आणि आरआरबींसाठी कामकाजाचा दिवस करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २७ सप्टेंबर रोजी बँक शाखा, कार्यालये, एटीएमशी संबंधित शाखा तसेच चलन तिजोरी सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांसह सार्वजनिक क्षेत्रातील  बँकांच्या ग्राहकांना या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. मात्र, संबंधित शाखेच्या स्थानिक वेळापत्रकानुसार सेवा उपलब्ध असू शकतात.

दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युन‌ियन्सने (UFBU)  २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. पाच दिवसांचा बँक‌िंग आठवडा लागू करणे ही संघटनांची प्रमुख मागणी आहे. कामगिरीशी संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनेबाबतची आणखी एक मागणी सरकारने सध्या स्थगित ठेवून मार्गी लावल्याचे सांगितले आहे.

३० सप्टेंबर हा बँकांचा सहामाही आर्थ‌िक वर्षअखेरचा दिवस असल्याने या काळात बँकिंग व्यवहारांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी महत्त्वाचे शाखा-आधारित व्यवहार शक्य असल्यास २७ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकार आणि बँक व्यवस्थापनांनी संघटनांना प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.  अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

बँक‌िग स्थिती : २६ ते ३० सप्टेंबर

२६ सप्टेंबर, शनिवार : चौथा शनिवार 

नियमित सुट्टी २७ सप्टेंबर, रविवार : सार्वजनिक क्षेत्रातील बँका व आरआरबी सुरू

२८ सप्टेंबर, सोमवार : प्रस्तावित देशव्यापी बँक संप

२९ सप्टेंबर, मंगळवार : प्रस्तावित देशव्यापी बँक संप,

३० सप्टेंबर, बुधवार : प्रस्तावित संप व सहामाही आर्थिक वर्षअखेर.

हेही वाचा
सर्व पहा