कुडचडे : येथील जीसूडा मार्केटमधून टीव्हीएस ज्युपिटर स्कूटरसहीत सुमारे २.६८ लाख रुपयांच्या मुद्देमालाच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. नागू क्याराकट्टी (हुबळी धारवाड, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून स्कूटर, मंगळसूत्र व इतर मिळून २.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरीची तक्रार कुडचडे पोलीस स्थानकात दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित नागू क्याराकट्टी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चाैकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ज्युपिटर स्कूटर आणि मंगळसूत्र जप्त केले.
या कारवाईमुळे चोरीच्या प्रकरणाचा तपास पुढे सरकला आहे. संशयिताचा आणखी काही चोरीच्या घटनात सहभाग आहे का किंवा कुठल्याही टोळीशी संबंधित आहे का, याचा शोध कुडचडे पोलीस घेत आहेत.
वरीलप्रकरणी सिद्धेश सावर्डेकर यांनी कुडचडे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.५५ ते ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर जीसूडा मार्केटमध्ये पार्क केली होती. अज्ञाताने स्कूटर चोरून नेली. स्कूटरमध्ये एक बॅग होती. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल, ३ हजार रुपये रोख रक्कम होती. कुडचडे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास केल्यानंतर वरील संशयिताला अटक केली.


