पणजी : गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या (GSSC) नावाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या एका बनावट आणि अनधिकृत भरती जाहिरातीची गंभीर दखल घेत गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक रोखण्यासाठी पोलिसांनी हे कारवाईचे पाऊल उचलले असून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
'एम्प्लॉयमेंट न्यूज - रोजगार समाचार' पेजवरून बनावट जाहिरात प्रसारित
'जीएसएससी ग्रुप सी रिक्रूटमेंट २०२६ - २१५ व्हॅलेंसीज' अशा नावाने ही बनावट जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे. 'एम्प्लॉयमेंट न्यूज - रोजगार समाचार' नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही अनधिकृत बातमी व जाहिरात प्रसारित केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही जाहिरात गोवा कर्मचारी निवड आयोगाने जारी केल्याचा बनाव रचून उमेदवारांची दिशाभूल केली जात आहे.
फसवणूक आणि डेटा चोरीच्या धोक्याची शक्यता
अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींमुळे नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींची मोठी दिशाभूल होत आहे. उमेदवारांकडून वैयक्तिक माहिती गोळा करणे अथवा अर्जाच्या नावाखाली आर्थिक रक्कम उकळून फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर गुन्ह्यामागे असलेल्या सूत्राधारांचा शोध घेण्यासाठी आणि जाहिरात तयार करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस यंत्रणा वेगाने तपास करत आहे.
सायबर गुन्हे पोलिसांकडून नागरिकांना आणि उमेदवारांना महत्त्वाचा सल्ला
सायबर गुन्हे पोलीस अधीक्षकांनी (SP) या प्रकरणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. केवळ सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांवर किंवा जाहिरातींवर विश्वास ठेवून कोणतीही पावले उचलू नयेत. नोकरीशी संबंधित सर्व माहिती केवळ गोवा कर्मचारी निवड आयोग आणि गोवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पडताळून पहावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


