पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचा अंतर्गत कलह पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोहोचला आहे. काही काळापूर्वी राजकारणातून संन्यास घेतलेले मनोज परब हे पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले असून, त्यांनी आमदार विरेश बोरकर यांचे निकटवर्तीय व समर्थक लिसीयो रोन्कोन यांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. खोटी माहिती पसरवून लिसीयो यांनी आरजीपी पक्षात फूट पाडल्याचा गंभीर आरोप परब यांनी केला आहे.
मनोज परब यांचे राजकीय पुनरागमन
आरजीपी पक्षात मनोज परब आणि आमदार विरेश बोरकार यांच्यात उभी फूट पडल्यानंतर बोरकार यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर चालणारा हा वाद काहीसा शांत झाला होता आणि केवळ समर्थक एकमेकांवर टीका करत होते. मात्र, आता मनोज परब पुन्हा एकदा राजकीय पटलावर सक्रिय झाले असून त्यांनी समर्थकांसोबत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. नुकतेच त्यांनी कलंगूट आणि कांदोळी येथील सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेऊन राजकीय पुनरागमनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
कथित ऑडिओ क्लिप आणि लिसीयो रोन्कोन यांच्यावर ताशेरे
सोशल मीडियावर सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात लिसीयो रोन्कोन यांचे कथित भाषण ऐकायला मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देताना परब यांनी सांगितले की, हा आवाज मडगाव येथील एका गुप्त बैठकीतील असून लिसीयो यांनी राज्यभरातील आरजी सदस्यांची दिशाभूल केली आहे. विरेश बोरकार यांच्या विजयी रॅलीत आपण उपस्थित असूनही गैरहजर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला. लिसीयो यांनी केवळ ख्रिश्चन सदस्यांना लक्ष्य करून धार्मिक फूट पाडण्याचा आणि गोवाविरोधी घटकांकडून पैसे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप परब यांनी केला.
आरोपांवर लिसीयो रोन्कोन यांचे प्रत्युत्तर आणि आव्हान
मनोज परब यांनी केलेल्या सर्व गंभीर आरोपांवर लिसीयो रोन्कोन यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परब यांनी अर्धवट माहिती पसरवण्याऐवजी तो संपूर्ण १८ मिनिटांचा ऑडिओ उघड करावा, असे थेट आव्हान रोन्कोन यांनी दिले आहे. दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या या राजकीय चिखलफेकीमुळे आरजीपी पक्षातील अंतर्गत वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


