नवी दिल्ली : २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या संघटनमंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जारी केलेल्या या नव्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांतर्गत गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शिवप्रकाश यांच्यावर गोव्याची जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या कार्यक्षेत्रात बदल करण्यात आले आहेत. आता त्यांच्याकडे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या पाच राज्यांची जबाबदारी देण्यात आली असून मुंबई हे त्यांचे मुख्य केंद्र असणार आहे. यापूर्वी त्यांच्याकडे तेलंगणा आणि पश्चिम बंगालची जबाबदारी होती, जी आता वगळण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने गोव्याचा समावेश त्यांच्या नव्या पोर्टफोलिओमध्ये करण्यात आला आहे.
सतीश धोंड यांची महाराष्ट्रात नियुक्ती आणि जनजाती संपर्क
भाजप नेते सतीश धोंड यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश सह संघटनमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते पश्चिम बंगालमध्ये हीच जबाबदारी सांभाळत होते. याशिवाय त्यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या चार महत्त्वाच्या राज्यांमधील 'जनजाती संपर्क' (आदिवासी विस्तार) उपक्रमांची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या संघटनात्मक रचनेला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


