भाजपच्या फायद्यासाठीच मतदार यादीतून नावे वगळली : काँग्रेसचा आरोप

भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. यामुळे पुढील निवडणुकीत आपण जिंकून येणार नाही हे भाजपला समजले आहे. यामुळे मतदारांची विशेष सखोल फेरतपासणीद्वारे (एसआयआर) भाजप विरोधात असणाऱ्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 mins ago
भाजपच्या फायद्यासाठीच मतदार यादीतून नावे वगळली : काँग्रेसचा आरोप

पणजी : भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. यामुळे पुढील निवडणुकीत आपण जिंकून येणार नाही हे भाजपला समजले आहे. यामुळे मतदारांची विशेष सखोल फेरतपासणीद्वारे (एसआयआर) भाजप विरोधात असणाऱ्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

गोव्यासह देशातील अन्य राज्यात देखील असे प्रकार झाल्याचा आरोप गोवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कवठणकर म्हणाले की, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या वृत्तानुसार एसआयआर मधील प्रक्रिये बाबत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग सिंधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतले होते. त्यांनी पत्र लिहून या प्रक्रियेत काही गोष्टी बेकायदेशीरपणे केल्या जात असल्याचे म्हटले होते. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तीन पैकी दोन निवडणूक आयुक्त यांनी केलेला आरोप गंभीर असून तो लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र याबाबत अद्यापही केंद्राने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. 

ते म्हणाले, एसआयआर प्रक्रियेतील चुकीच्या गोष्टींबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आधीच आक्षेप नोंदवला होता. गोव्याचा विचार करता येथील १० टक्के मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले होते. याबाबत सुनावण्या पूर्ण झाल्यावर गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ९७ मतदारांना पुन्हा यादीत घेण्याबाबत आयोगाला पत्र लिहिले होते. या कार्यालयाने आठ वेळा पत्र लिहून देखील आयोगाने याची दखल घेतली नाही. गोव्यात चुकीच्या पद्धतीने नावे वगळण्यात आल्या बाबत काँग्रेस पक्षाकडे देखील तक्रारी आल्या आहेत. 

याबाबत आम्ही हेल्पलाईन सुरू केली आहे

ज्या लोकांना आपले नाव अयोग्य पद्धतीने काढून टाकले असे वाटत असेल त्यांनी आमच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. याशिवाय आमचे बूथ लेवल कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करत आहेत. मतदार यादीतून नावे अयोग्य पद्धतीने काढली असल्यास त्यांची माहिती घेत आहेत.

याशिवाय या कामासाठी आम्ही खाजगी एजन्सी देखील नेमली आहे. एजन्सी अशा लोकांना शोधून काढण्यात आमची मदत करत आहे. मतदार यादीत पुन्हा नाव करण्याचे काम क्लिष्ट करून ठेवले आहे. मात्र काँग्रेस पक्षाचे प्रयत्न सुरू असल्याचे सुनील कवठणकर यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा