पणजी : राज्य सरकार १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया पूर्णपणे बंद करण्याबाबत नव्हे, तर निर्बंध घालण्याबाबत विचार करत आहे. याविषयी आम्ही यापूर्वीच केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. येणाऱ्या काळात आम्ही दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेणार आहोत. गोव्यामध्ये अशा निर्बंधाची का आवश्यकता आहे हे त्यांना समजावून सांगण्यात येईल. अनेक देशांनी अशी पावले उचलली आहेत. त्यामुळे आपण मागे पडू नये असे आम्हाला वाटत असल्याचे आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
गुरुवारी पर्यटन खात्यातर्फे आयोजित गोवा युवा पर्यटन मिट या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खंवटे यांनी सांगितले की, सोळा वर्षांखालील मुलांनी तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींचे ज्ञान घेण्यासाठी केला पाहिजे. त्यांनी गुगल किंवा एआय टूल्सचा वापर करावा. यासाठी खात्यातर्फे देखील प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांच्यासाठी हे वय शिकण्याचे असते.
अशावेळी मुलांनी सोशल मीडियाचा वापर रील पाहणे, गेम्स खेळणे यासाठी करू नये असे आम्हाला वाटते. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मोबाईल फोन दिला नाही म्हणून एका लहान मुलाने आत्महत्या केली. देशभरात अशा विविध घटना होत आहेत. यातील काही घटनांची नोंद होते तर काही नोंदवल्या जात नाहीत.
ते म्हणाले, समाज माध्यमांमुळे अशा घटना होत असेल तर ती गंभीर बाब आहे. याचा पालकांनी देखील विचार केला पाहिजे. मुलांनी सोळा वर्षापर्यंत शैक्षणिक टूल्स वापरणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे करिअर घडवावे. स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या वयात मोबाईल अथवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे चुकीचे आहे.
दीड ते दोन तास मोबाईलवर
एका अभ्यासानुसार देशात १६ वर्षाखालील एक मुलगा दिवसाचे दीड ते दोन तास मोबाईलवर घालवतो. त्यामुळे समाज माध्यम आणि काही गेम्स वर निर्बंध घालणे आवश्यकच आहे. आमचे विचार आम्ही या आधीच केंद्र सरकारला कळवले आहेत.


