गतिरोधकाजवळ दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या मांद्रेतील महिलेचा मृत्यू

गणेश विसर्जनस्थळावरून पतीसोबत दुचाकीवरून घरी जात असताना गतिरोधकाजवळ तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मांद्रे येथील दीपाली महेश म्हामल (वय ४५, रा. मधलामाज-मांद्रे, पेडणे) यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
गतिरोधकाजवळ दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या मांद्रेतील महिलेचा मृत्यू

पेडणे : गणेश विसर्जनस्थळावरून पतीसोबत दुचाकीवरून घरी जात असताना गतिरोधकाजवळ तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मांद्रे येथील दीपाली महेश म्हामल (वय ४५, रा. मधलामाज-मांद्रे, पेडणे) यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.

याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली म्हामल या १९ सप्टेंबर  रोजी आपल्या पतीसोबत गणपती विसर्जनस्थळावरून मधलामाज येथून देऊळवाडा-मांद्रेच्या दिशेने दुचाकीवरून जात होत्या. त्या दुचाकीच्या मागील आसनावर बसल्या होत्या. मधलामाज येथील एचडीएफसी बँकेजवळ पोहोचल्यावर गतिरोधकामुळे त्यांचा अचानक तोल गेला आणि त्या दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या.

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम तुये येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणि नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, बांबोळी येथे हलविण्यात आले. १९ सप्टेंबरपासून त्यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरू होते. मात्र, २३ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

या अपघातासंदर्भात यापूर्वी मोटार वाहन अपघात म्हणून नोंदविण्यात आला होता.प्राथमिक चौकशीत या घटनेत कोणताही संशयास्पद प्रकार अथवा घातपात असल्याचे आढळून आलेले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारात ठेवण्यात आला.

घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, पर्वरी तसेच पेडणे उपजिल्हाधिकारी आणि पेडणे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण एस. देसाई करीत आहे.