पर्वरी उड्डाणपूल: वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नवे एंट्री-एक्झिट पॉईंट्स कार्यान्वित

पर्वरी उड्डाणपुलामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अटल सेतूवर मॅजेस्टिक हॉटेलजवळ नवे एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स सुरू.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 mins ago
पर्वरी उड्डाणपूल: वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नवे एंट्री-एक्झिट पॉईंट्स कार्यान्वित

पणजी : गेल्या काही दिवसांपासून बांबोळी, पणजी आणि पर्वरी या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीनंतर अटल सेतूवरून पर्वरी आणि म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आवश्यक उपाययोजना करून नवे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीडब्ल्यूडी दिगंबर कामत यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, अटल सेतूवर मॅजेस्टिक हॉटेलजवळ नवीन ॲक्सेस विकसित करून वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



मॅजेस्टिक हॉटेलजवळ नवे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग

निओ मॅजेस्टिक हॉटेलच्या परिसरात म्हापसाच्या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी दोन एक्झिट आणि एन्ट्री पॉईंट्स देण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. याशिवाय एका विशिष्ट बाजूने आणखी एक एन्ट्री पॉईंट उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खाते, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कंत्राटदार आणि वाहतूक पोलीस संयुक्तपणे या संपूर्ण व्यवस्थेची अंमलबजावणी करत आहेत. वाहनधारकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल्स आणि दिशादर्शक फलक बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. नियोजनाचा एक भाग म्हणून सकाळीच काही भागांत नवीन एक्झिट मार्ग प्रायोगिक तत्त्वावर उघडण्यात आला. 




पहिल्याच दिवशी वाहनचालकांचा गोंधळ आणि अपघाताचा धोका

हे नवे मार्ग प्रायोगिक तत्त्वावर उघडण्यात आले असले तरी रस्त्यावर योग्य मार्गदर्शक फलकांची कमतरता असल्याने पहिल्याच दिवशी वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर केवळ वेगमर्यादेचा एकच फलक असल्याने अचानक लेन बदलताना अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे वाहनचालकांनी नमूद केले. पुरेशा माहितीअभावी अनेक वाहने चुकीच्या मार्गाने गेल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. प्रशासनाकडून पूर्ण व्यवस्था आणि स्पष्ट फलक उभारल्यानंतरच पर्वरीतील वाहतूक समस्या खऱ्या अर्थाने सुटेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा