पणजी :पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आणि जिवंत काडतुसे गुन्हा शाखेला शिरसई येथे थिवी रेल्वे स्थानकाजवळील एका झाडीत सापडली. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून, पुढील तपासासाठी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
गोळीबारातील पिस्तूल झाडीत सापडले
निओ मॅजेस्टिक कॅसिनोबाहेर शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४७ वाजण्याच्या सुमारास संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोन हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले होते. या हल्ल्यानंतर नायक यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून हल्लेखोरांवर प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केले होते.
सात संशयितांना अटक
या प्रकरणी गुन्हा शाखेने मुख्य संशयित सतीश शिंदे, दोन्ही शूटर अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार आणि बाबू ऊर्फ इसार अली यांच्यासह काझू अलाउद्दीन शेख, इसरार अली अहमद, सूरज उपेंद्र आचार्य आणि पवन हरी सिंग सौर या संशयितांना अटक केली आहे.
यातील दोन्ही शूटर अर्पुथराज आणि बाबू हे सध्या गुन्हा शाखेच्या कोठडीत असून, इतरांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
गुन्हा शाखेने बुधवारी दोन्ही शूटर्सची कसून चौकशी केली असता, अण्णा याने गोळीबारातील पिस्तूल शिरसई-थिवी रेल्वे स्थानकाजवळील स्मशानभूमी परिसरात फेकल्याची माहिती दिली.
त्यानुसार, पोलिसांनी दोघांना तिथे नेऊन शोध घेतला असता, तेथे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले.
गुन्हा शाखेकडून पुढील तपास
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निखिल पालेकर करत आहेत.


