मडगाव : कोकणी भाषा मंडळाचे २०२६ या वर्षासाठीचे प्रतिष्ठित वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. मंडळाच्या ६४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष कार्यक्रमात या सर्व पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. हा भव्य सोहळा येत्या २ ऑक्टोबर रोजी मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन सभागृहात सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे, अशी माहिती कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष सेराफीन कॉता आणि रत्नमाला दिवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग नाडकर्णी, डॉ. नितीन बोरकर आणि मुक्ता आगशीकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोकणी भाषा विषयात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार असून त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
विविध क्षेत्रांतील विशेष आणि शिक्षक पुरस्कारांची घोषणा
कोकणी भाषा मंडळ पुरस्कृत सेवा पुरस्कार यंदा फादर मायकल फर्नांडिस, फादर लिनो फ्लोरिंडो, सुरंगा मडकईकर, हिरू नायक आणि सुरेश कोलवेकर यांना प्रदान केला जाईल. सेराफीन कॉता पुरस्कृत फेलिस्यु कार्दोज स्मरणार्थ प्राथमिक आणि माध्यमिक विभाग शिक्षक पुरस्कार स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे. विजय सरदेसाई पुरस्कृत माधवी सरदेसाई उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय विभाग शिक्षक पुरस्कार सुचेता पै यांना, तर लिगोरिओ फुर्तादो ट्रस्ट स्मरणार्थ पत्रकारिता पुरस्कार अतुल पंडित यांना देण्यात येणार आहे. याशिवाय, दिनेश मणेरकर पुरस्कृत चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार ब्रदर जॉन अल्फान्सो यांना प्राप्त झाला आहे.
युवा, बालसाहित्य आणि इतर साहित्य पुरस्कार
विन्सी क्वाद्र्श पुरस्कृत जुझे पिएदाद स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार उल्हास गावकर, रूपेश ठाणेकर आणि सुचिता नार्वेकर यांना प्रदान केला जाईल. फा. मोरेन डिसोझा स्मरणार्थ युवा साहित्य पुरस्कार श्रध्दा गरड यांना, तर विक्रम वेर्लेकर पुरस्कृत युवा उद्योजिका पुरस्कार गौतमी रायकर यांना मिळाला आहे. बालसाहित्य पुरस्कार श्रीकांत नागवेकर यांच्या 'नवलांच्यो विज्ञान कथा' या पुस्तकाला प्राप्त झाला आहे.
रुपा राजेश केणी यांच्या 'विजमीत आनी हेर कथा' या पुस्तकासाठी रॉक बार्रेट साहित्य पुरस्कार, तर फादर रोमन रॉड्रिग्ज यांच्या 'धागे' या रोमी लिपीतील पुस्तकाला श्रीधर कामत मित्र परिवार पुरस्कृत श्रीधर कामत साहित्य पुरस्कार घोषित झाला आहे. शितल नंदकुमार परब यांच्या 'गांवां कडल्यो कविता' या काव्यसंग्रहाला कोकणी भाषा मंडळ पुरस्कृत रमेश वेळुस्कर साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे. दिनेश मणेरकर पुरस्कृत रामनाथ मणेरकर अनुवाद पुरस्कारासाठी योग्य पुस्तक उपलब्ध नसल्याने यंदा हा पुरस्कार देण्यात आलेला नाही. या सर्व पुरस्कारांसाठी कोकणी भाषेतील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि परीक्षकांनी निवड समिती म्हणून काम पाहिले आहे.


