यापुढे खाणकाम बंद पाडण्यासाठी प्रयत्न करू नका!

सरकारने राज्यात आणलेल्या खासगी डंप धोरणामुळे गावातील खनिज डंपचा ई-लिलाव करून तो बाहेरील कंपन्यांच्या हातात न देता गोव्यातीलच कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th September, 09:43 pm

सरकारने राज्यात आणलेल्या खासगी डंप धोरणामुळे गावातील खनिज डंपचा ई-लिलाव करून तो बाहेरील कंपन्यांच्या हातात न देता गोव्यातीलच कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे धोरण राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे स्थानिक लोकांनाच रोजगार मिळणार आहे. त्यामुळे यापुढे लोकांनी किंवा पंचायत मंडळाने खाणकाम अडवून ते बंद पाडण्याचे प्रयत्न करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पाळी येथे खासगी डंप धोरणानुसार डंप हाताळणी प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चौगुले कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन चौगुले, जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, पाळीचे सरपंच प्रसाद सावंत, वेळगेच्या सरपंच योगिता हळदणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डंप हाताळणीनंतर ५० हजार चौ. मीटर जागा मोकळी होणारचौगुले कंपनी हा डंप हाताळणार असून, डंप काढल्यानंतर सुमारे ५० हजार चौरस मीटर जागा खुली होईल. या जागेत भविष्यात औद्योगिक प्रकल्प, वृक्षारोपण किंवा इतर कोणताही विकास प्रकल्प राबवता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कायदेशीर अडथळे अन् न्यायालयाची मान्यता!

न्यायालयाने खाणी बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत आहे, हे सर्वांना माहीत आहे. या सर्व कायदेशीर अडचणी दूर करत सर्वोच्च न्यायालयासमोर गोव्याचे खासगी डंप धोरण सादर करण्यात आले होते.

त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आज साखळी मतदारसंघात डंप हाताळणीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केली टीका

  1. काही लोक सध्या पणजीतील मोठ्या वकिलांना आणि पर्यावरणवाद्यांना भेटून खाणकाम बंद पाडण्याच्या हालचाली करत आहेत. मात्र, गावातील खाणकाम आणि गाव कशाप्रकारे सांभाळावे, हे आम्हाला कोणीही सांगण्याची गरज नाही.
  2. गोव्यात अद्याप पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू झालेले नाही. तरीही सरकार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत आहे.
  3. खाणी बंद पडल्यानंतर येथील अवलंबून असलेल्या लोकांना कशाप्रकारे यातना भोगाव्या लागल्या, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आता सुरू झालेल्या या कामाला कोणीही ग्रहण लावण्याचा प्रयत्न करू नये.

खाण भागातील लोकांना रोजगाराची अपेक्षा

खाणकाम बंद पडल्यानंतर खाण भागातील लोक, कामगार आणि विविध सेवा पुरवणाऱ्यांनी खूप वेदना सहन केल्या आहेत. आता चौगुले खाण कंपनीतर्फे पाळी गावात पुन्हा काम सुरू करण्यात येत असून अनेक वर्षांपासून पडून असलेली यंत्रे पुन्हा कार्यरत होतील.

या कामाबरोबरच गाव आणि लोकांच्या हितासाठी कंपनी सदैव कार्यरत राहील, असे चौगुले कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन चौगुले यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा