नवी दिल्ली : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना वाढल्या असून, ग्यालशिंग जिल्ह्यातील रिम्बी गावात गुरुवारी रात्री झालेल्या भूस्खलनात ३० हून अधिक घरे आणि सरकारी निवासस्थाने वाहून गेली. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. गुरुवारी सुरू झालेला मुसळधार पाऊस शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होता.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आता कमकुवत झाले असले, तरी त्याचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये जाणवत आहे. ओडिशात मुसळधार पाऊस, अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. गुरुवार दुपारपर्यंत ८,०८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. या हवामान प्रणालीचा नऊ राज्यांवर परिणाम झाला आहे. पुढील २४ तासांत छत्तीसगड, किनारपट्टी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणात अतिवृष्टीची शक्यता आहे. मेघगर्जनेसह ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेश, बिहारमध्येही पावसाचा इशारा
मध्य प्रदेशात शक्तिशाली हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. जबलपूरसह १३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. आणखी १६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहारमधील १९ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हरियाणातील यमुनानगर, कर्नाल आणि पानिपतसह सहा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात मान्सून पुन्हा सक्रिय
उत्तर प्रदेशातही मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. लखनऊ, कानपूर, उन्नाव, वाराणसी, प्रयागराज आणि जौनपूरसह सुमारे २० शहरांत पाऊस सुरू आहे. लखनऊमध्ये गुरुवार संध्याकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
उत्तराखंडमध्ये भूस्खलनासह हिमवृष्टी
उत्तराखंडमध्येही मान्सून सक्रिय झाला असून, डेहराडून आणि हरिद्वारमध्ये अधूनमधून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे हरिद्वारमधील हर की पौरी घाट परिसरात यात्रेकरूंना आश्रय घ्यावा लागला. चमोली जिल्ह्यात कर्णप्रयाग-गैरसैन महामार्गावर भूस्खलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान एक स्कूटर ढिगाऱ्याखाली गाडली गेली, तर एक स्कूटरस्वार भूस्खलनातून थोडक्यात बचावला.
बद्रीनाथ-सतोपंथ मार्गावरील चक्रतीर्थ परिसरात बुधवारी संध्याकाळी जोरदार हिमवृष्टी झाली. त्यामुळे संपूर्ण परिसर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकला गेला. हवामान विभागाने नैनिताल, चंपावत आणि उधमसिंह नगरच्या काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पौरी, चमोली, बागेश्वर, अल्मोरा आणि पिथोरागढमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


