पणजी : गोवा भाजपचे वरिष्ठ नेते तथा पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांचे आज निधन झाले. अनिल होबळे यांनी गोवा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ संघटनात्मक जबाबदारी सांभाळली होती. पक्षसंघटनेतील विविध पदांवर काम करताना त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय त्यांनी ‘गोवा राज्य अनुसूचित जाती (एससी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळा’चे अध्यक्षपदही भूषवले होते. या पदावर असताना त्यांनी मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले होते.
त्यांनी भाजपच्या तिकिटावर सांताक्रूझ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अनिल होबळे यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता मेरशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.