पणजी: देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीमध्ये (एसआयआर) अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यात आल्या आहेत. याला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस आमदार कार्लूस फेरेरा यांनी केली.
शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रवक्ते अमित पालेकर , सावियो कुतिन्हो उपस्थित होते.
फेरेरा यांनी सांगितले की, एसआयआर प्रक्रियेबाबत सुरुवातीपासूनच आम्ही आक्षेप घेतले होते. आमचे नेते राहुल गांधी यांनी याला सरळ सरळ वोट चोरी असेच नाव दिले होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या प्रक्रियेतील अनियमितेबाबत अन्य निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग सिंधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतले होते.
त्यांनी पत्र लिहून या प्रक्रियेत काही गोष्टी बेकायदेशीरपणे केल्या जात असल्याचे म्हटले होते. कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन आयुक्त यांचे अधिकार एकच आहेत. कोणताही निर्णय घेताना तिघांच्या संमतीनेच घ्यावा लागतो. हे माहिती असूनही मात्र ज्ञानेश कुमार यांनी त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले.
तीन पैकी दोन निवडणूक आयुक्त यांनी केलेला आरोप गंभीर असून तो लोकशाहीसाठी घातक आहे. आतापर्यंत एसआयआर प्रक्रियेद्वारे १३ कोटी मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. बहुतेक ठिकाणी निवडणूक अगदीच तोंडावर असताना ही नावे वगळण्यात आली. यामुळे मतदारांना याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ मिळाला नाही.
यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ भाजपला फायदा करून देण्यासाठीच होती हे स्पष्ट होते. भाजप सरकार नियम बदलून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. ज्ञानेश कुमार यांचे वागणे लोकशाही विरोधी असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केली पाहिजे अशी मागणी फेररा यांनी केली.
गोव्यात १.२० लाख लोकांची नावे वगळली : पालेकर
अमित पालेकर म्हणाले की, एसआयआरमध्ये गोव्यातील सुमारे १.२० लाख जणांची नावे वगळण्यात आली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यातील बहुतेक नावे कॅथलिक अथवा मुस्लिम समाजातील मतदारांची होती. काही मतदारसंघांत तर बीएलओ भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करत होते.
याप्रकरणी गुन्हे दाखल करून खटला चालवला पाहिजे. गोव्यातील मतदारांनी मतदार यादी पुन्हा एकदा बघून आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी. आपले नाव चुकीच्या पद्धतीने वगळले असे वाटल्यास आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.


