पणजी : गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटन चित्र अधिक चमकदार होण्याचे संकेत मिळत असून, आगामी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दाबोळी विमानतळावर सुमारे १४४ आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमाने उतरणार आहेत. या विशेष चार्टर्ड विमानांच्या माध्यमातून सुमारे २५,९२० परदेशी पर्यटक गोव्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे ऐन हंगामाच्या काळात राज्यातील आदरातिथ्य, वाहतूक, पर्यटन आणि इतर संलग्न व्यवसायांना मोठा आर्थिक हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वर्ष २०२६-२७ च्या पर्यटन हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमान ३० सप्टेंबर रोजी दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहे. रशियाची 'एरोफ्लॉट' ही एअरलाइन्स १८० प्रवाशांना घेऊन गोव्यात येणार असून, या आगमनाने राज्यातील परदेशी पर्यटन हंगामाची औपचारिक सुरुवात होईल. उपलब्ध माहितीनुसार, एरोफ्लॉट एअरलाइन्स या संपूर्ण हंगामात दाबोळीसाठी एकूण ९६ चार्टर्ड फेऱ्या चालवणार आहे. रशियातील मॉस्को आणि येकातेरिनबर्ग या शहरांना गोव्याशी थेट जोडले जाणार असून, दर आठवड्याला बुधवार आणि शनिवार अशा चार फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
रशियन पर्यटकांसोबतच यंदा कझाकस्तानमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला भेट देणार आहेत. कझाकस्तानची 'स्कॅट एअरलाइन्स' ऑक्टोबर महिन्यापासून दाबोळीसाठी आपली चार्टर्ड सेवा सुरू करणार आहे. ही एअरलाइन्स दर आठवड्याला मंगळवार आणि शुक्रवार अशा दोन फेऱ्या चालवणार आहे. संपूर्ण हंगामात स्कॅट एअरलाइन्सच्या सुमारे ४८ चार्टर्ड फेऱ्या दाबोळीत उतरतील, ज्यामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.
ऑक्टोबर ते मार्च हा सहा महिन्यांचा कालावधी गोव्यातील पर्यटनाचा मुख्य टप्पा मानला जातो. हजारो परदेशी पर्यटकांच्या आगमनामुळे हॉटेल्स, टॅक्सी व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, रेस्टॉरंट्स आणि स्थानिक बाजारपेठांमधील मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पहिल्या चार्टर्ड विमानाच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळ प्राधिकरण आणि पर्यटन क्षेत्रातील घटक पूर्णपणे सज्ज झाले आहेत.


