गोवा राखण यात्रेत स्थानिकांपेक्षा परराज्यातील लोक अधिक : मुख्यमंत्री

सध्या एका पक्षातर्फे गोवा राखण यात्रा सुरू आहे. यामध्ये स्थानिकांपेक्षा परराज्यातील लोकच अधिक आहेत. राखण यात्रा काढणाऱ्यांनी ते सत्तेत असताना गोव्याचे रक्षण का केले नाही ते सांगावे. गोव्याचा खरा विकास भाजपच्या डबल इंजिन सरकारनेच केला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.


45 mins ago
गोवा राखण यात्रेत स्थानिकांपेक्षा परराज्यातील लोक अधिक : मुख्यमंत्री

पणजी : सध्या एका पक्षातर्फे गोवा राखण यात्रा सुरू आहे. यामध्ये स्थानिकांपेक्षा परराज्यातील लोकच अधिक आहेत. राखण यात्रा काढणाऱ्यांनी ते सत्तेत असताना गोव्याचे रक्षण का केले नाही ते सांगावे. गोव्याचा खरा विकास भाजपच्या डबल इंजिन सरकारनेच केला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

 शुक्रवारी भाजपच्या अटल भवन कार्यालयातील ईन्‍ लायब्ररी सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार राजेश फळदेसाई, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस उपलब्ध होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज अटल भवन मध्ये लायब्ररी तसेच ई लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ई लायब्ररी भाजपच्या केंद्रीय मुख्यालयाशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रात समन्वय साधणे सुलभ होणार आहे. या ई लायब्ररीद्वारे केंद्र तसेच अन्य भाजपशासित राज्यांनी सुरू केलेल्या विविध योजना, उपक्रम यांची माहिती मिळणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जारी केलेले नवीन नियम यांची देखील माहिती मिळेल. राज्यातील भाजप कार्यकर्ते, आमदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

ते म्हणाले, या लायब्ररीचा वापर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. विद्यार्थी संशोधक यांना देखील या लायब्ररीचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने प्रशासनासाठी तयार केलेले नवीन कायदे, नियम आदींचा अभ्यास करण्यासाठी ही लायब्ररी उपयुक्त ठरेल. सामान्य नागरिकांनाही या लायब्ररीचा वापर करता येईल. भाजप कार्यकर्ते सोडून अन्य कोणालाही या लायब्ररीचा वापर करायचा असेल तर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. भाजप सरकार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्त्वावर चालत आहोत.याबाबत सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती देखील ई लायब्ररीवर मिळेल.

 २०२७ मध्ये ३० जागांचा संकल्प : दामू नाईक

दामू नाईक म्हणाले की, दीनदयाळ उपाध्याय यांनी सत्ता हे साध्य नसून साधन असल्याचे सांगितले होते. सत्तेचा वापर अंत्योदयासाठी करावा असेही ते म्हणाले होते. आज केंद्र आणि राज्यातील सरकार त्यांच्या तत्वावर पुढे चालले आहे. २०२७ मध्ये ३० जागांचा संकल्प बांधताना आपण सर्वांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी , अटल बिहार वाजपेयी व अन्य भाजप नेत्यांच्या आदर्शांवर चालण्याची शपथ घेऊया.

निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था : मुख्यमंत्री डॉ. सावंत

निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था असून त्याचा राजकीय पक्षाचा संबंध नाही. एसआयआर प्रक्रिया ही निवडणूक आयोगाने केली आहे. ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांना आयोगाने नियमानुसार पुन्हा संधी दिली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा