नवी दिल्ली : भारतीय आधुनिक चित्रकलेच्या जगतातील अग्रगण्य आणि गोव्याचे सुपुत्र फ्रान्सिस न्यूटन सोझा (एफ. एन. सोझा) यांच्या एका दुर्मिळ कलाकृतीने आंतरराष्ट्रीय कला बाजारात नवा इतिहास रचला आहे. प्रतिष्ठित 'सफ्रनआर्ट' या संस्थेने आयोजित केलेल्या 'ऑटम ऑक्शन'मध्ये सोझा यांच्या १९६५ मधील 'हनुमान द मंकी गॉड' या चित्राचा तब्बल १५.६० कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. एफ. एन. सोझा यांनी कागदावर साकारलेल्या (Work on Paper) कोणत्याही स्वतंत्र कलाकृतीसाठी जागतिक स्तरावर मिळालेली ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम ठरली आहे.
'वॉश अँड गॉस' प्रकारातील हे दुर्मिळ चित्र सोझा यांनी नाथद्वारा परंपरेतील चित्रकार मोहन शर्मा यांच्याशी केलेल्या सहकार्यातून साकारले होते. सोझा यांच्या त्या काळातील जाड रंगांच्या आणि गडद रेषांच्या 'ब्लॅक ऑन ब्लॅक' या प्रचलित शैलीपेक्षा हे चित्र अत्यंत भिन्न आणि लयबद्ध मानले जाते. सुरुवातीला या चित्राची अंदाजित किंमत १.५ ते २.५ कोटी रुपये बांधण्यात आली होती, मात्र कलाप्रेमी आणि संग्राहकांच्या तुफान प्रतिसादामुळे या कलाकृतीने १५.६० कोटींचा टप्पा गाठला.
सफ्रनआर्टच्या १९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या लाईव्ह लिलावात २१८.६२ कोटी रुपये आणि २१-२२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या ऑनलाइन लिलावात ३१.९७ कोटी रुपये असे एकूण २५०.५८ कोटी रुपयांचे २५० हून अधिक कलाप्रकार विकले गेले. संस्थेने सर्व १०० टक्के कलाकृतींची यशस्वी विक्री नोंदवत 'व्हाइट ग्लोव्ह' लिलाव श्रेणीत स्थान पटकावले आहे. याच लिलावात एम. व्ही. धुरंधर यांचे 'श्री महालक्ष्मी' हे १८९९ मधील चित्र १४.१ कोटी रुपयांना, ए. रामचंद्रन यांचे 'कुर्म अवतार' ८.६ कोटी रुपयांना, जी. रवींदर रेड्डी यांची कलाकृती ४.७ कोटी रुपयांना, तर सोहन कादरी यांचे चित्र ३.८ कोटी रुपयांना विकले गेले.
भारतीय आधुनिक कला चळवळीतील (Progressive Artists' Group) सोझा यांच्या चित्रांच्या या यशामुळे जागतिक कला बाजारात भारतीय कलेचे स्थान आणि मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या लिलावामुळे जागतिक कलाप्रेमी आणि संग्राहकांचा भारतीय कलेवरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे मत सफ्रनआर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक दिनेश वझिराणी यांनी व्यक्त केले आहे.


