साखळी : हरवळे साखळी येथील लोकवस्तीत फिरणाऱ्या गव्याला पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर हरवळेच्या बाहेर पिटाळून लावले होते. परंतु, रात्रीच सदर गवा पुन्हा हरवळे पंचायत क्षेत्रातील ग्वाला इंडिया कंपनीच्या परिसरात वरचे हरवळे गावात जाणाऱ्या रस्त्यावर दिसून आल्याने पुन्हा हरवळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून या गव्याला पुन्हा पिटाळून लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी दिवसभर हरवळेतील जंगल भागात या गव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दिवसभराच्या शोधात गवा कुठेही सापडू शकला नाही. हरवळे परिसरात हा गवा असल्याने कोणत्याही क्षणी तो दिसू शकतो. गावातील लोकांनी याबाबत खबरदारी बाळगावी. गवा दिसल्यास त्याची कल्पना वन खात्याला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या या गव्याच्या शोधार्थ वन खात्याबरोबरच स्थानिक नागरिकही गुंतले आहेत.
मंगळवारी दुपारी हा गवा दिनकर नगर भागात भररस्त्यात दृष्टीस पडल्यानंतर लगेच वन खात्याला कल्पना देण्यात आली होती. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत अथक प्रयत्न करून गव्याला हरवळेतील गणेश विद्यालयाच्या मागील बाजूस जंगलात हाकलून लावले होते. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
मात्र, पुन्हा त्याच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गव्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने पाठविण्यासाठी वन खात्यासह संबंधित शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, स्थानिक नागरिकही सतर्क झाले आहेत.


