म्हापसा : कांदोळी येथे गटारवजा फुटपाथच्या सार्वजनिक बांधकामात अडथळा तसेच कंत्राटदार आणि कर्मचार्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली दोघा स्थानिक रहिवाशांविरुद्ध कळंगुट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने फुटपाथ बांधण्याच्या नावाखाली रहिवाशांच्या मालमत्तेची नासधूस चालवली असल्याचा दावा करत काही ग्रामस्थांनी या कामाला आक्षेप घेतला होता.
जीएसआयडीसीचे चेअरमन तथा आमदार मायकल लोबो यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डेरिक गोन्साल्विस आणि ग्लेन फर्नांडिस यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवला आहे. ही घटना गुरुवार, २४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. आमदार लोबो यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी ६.३२ वाजता ही कारवाई करत त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी संशयित डेरिक आणि ग्लेन यांना त्याचवेळी पकडून ताब्यात घेतले होते व रात्री उशीरा त्यांची सुटका केली होती.
संशयित आरोपींनी आपापसातील सामान उद्देशाने सरकारने अधिकृत मंजूर केलेल्या साबांखाच्या कामाच्या ठिकाणी येवून सदर कामाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण केला. तसेच, काम न थांबवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी व दहशत निर्माण केली. फौजदारी स्वरूपाचे बळ वापरून, कंत्राटदार व तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कर्मचारी व कामगारांना काम करण्यापासून रोखले व अडथळा आणला.
सरकारी अधिकृत सार्वजनिक काम करणार्या फिर्यादी लोकसेवकाच्या कार्यात अडथळा निर्माण केला व त्यांना काम करण्यापासून परावृत्त केले, असा आरोपाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम १३२, २२१, ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच बीएनएसएस कायदा कलम ३५(३) अंतर्गत संशयितांना नोटीस बजावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर हे करत आहेत.
मालमत्तेमध्ये अतिक्रमण, नुकसान केल्याचा दावा
गुरुवार पासून साबांखाने कांदोळीमधील मुख्य रस्त्याच्या कडेला फुटपाथवजा गटार बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या बांधकामावेळी मालमत्तेमध्ये अतिक्रमण तसेच नुकसान केल्याचा दावा करत काही ग्रामस्थांनी या कामाला आक्षेप घेतला. तसेच कामाची वर्क ऑर्डर व इतर कायदेशीर कागदपत्रे सादर करण्याची मागणी कंत्राटदार तसेच आमदारांकडे केली होती. त्यामुळे काहीवेळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर कळंगुट पोलिसांनी घटनास्थळावरून डेरिक गोन्साल्विस आणि ग्लेन फर्नांडिस यांना ताब्यात घेतले होते.


