२१ बनावट कंपन्यांद्वारे काळा पैसा वळवला; सीए भूषण मोयेचा जामीन फेटाळला

डिजिटल अरेस्टद्वारे महिलेची फसवणूक प्रकरण


just now
२१ बनावट कंपन्यांद्वारे काळा पैसा वळवला; सीए भूषण मोयेचा जामीन फेटाळला

पणजी : पोलिसांकडून खाती गोठवण्यात आल्याची तसेच प्राप्तिकर विभागाचे प्रतिकूल शेरे असतानाही मुख्य संशयिताच्या फायद्यासाठी २१ बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून गुन्ह्यातील काळा पैसा विविध खात्यांमध्ये वळवण्यात आला. संशयिताला जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या निरीक्षणांची नोंद करत मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) भूषण मोये याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. विजया आंब्रे यांनी दिला.

गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने सासष्टी तालुक्यातील एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानुसार, संशयितांनी तक्रारदाराला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून त्यांचे जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. तसेच गोयल यांनी मुंबईतील कॅनरा बँकेत या महिलेच्या नावावर खाते उघडून त्यात ६ कोटी रुपये जमा केल्याचे सांगितले. ही रक्कम मनी लाँड्रिंगशी निगडित असल्याचे सांगून संशयितांनी त्यांच्याकडून प्रकरण मिटविण्यासाठी तब्बल २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपये उकळले.

या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय आल्याने ‘ईडी’ने चौकशी सुरू केली. याच दरम्यान ‘ईडी’ने २३ ऑगस्ट रोजी मुंबईत कारवाई करून मुख्य सूत्रधार फहीम सय्यद व नईम सय्यद या दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, चार्टर्ड अकाउंटंट भूषण मोये हा त्यांना मदत करत होता. त्याने मुख्य संशयिताच्या सांगण्यावरून २१ बनावट कंपन्या स्थापन केल्याचे उघड झाले. तसेच शैलेश चव्हाण आणि विलास पवार हे दोघे फसवणुकीची रक्कम विविध एटीएममधून काढून त्यांना देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ‘ईडी’ने वरील तिघांना २७ रोजी अटक केली.

ईडीतर्फे विशेष अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी बाजू मांडली. मोये याने पोलिसांकडून खाती गोठवण्यात आल्याची व प्राप्तिकर विभागाचे प्रतिकूल शेरे असतानाही मुख्य संशयिताच्या फायद्यासाठी २१ बनावट कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून गुन्ह्यातील काळा पैसा वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवण्यात आला. संशयिताला जामीन मंजूर केल्यास तो साक्षीदारावर दबाव टाकणार असल्याचा युक्तिवाद मांडला. न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला.

मुख्य संशयिताच्या सांगण्यावरून कंपन्या स्थापन

मोये याने मेरशी येथील विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, केवळ मुख्य संशयिताच्या सांगण्यावरून कंपन्या स्थापन करण्याचे काम करत होते. त्यांना त्या कंपन्यांच्या दैनंदिन व्यवहारांची किंवा प्रशासनाची कोणतीही माहिती नव्हती. असा युक्तिवाद संशयितांतर्फे न्यायालयात मांडला. 

हेही वाचा
सर्व पहा