सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान महामुकाबला

टीम इंडियाचा श्रीलंका संघावर ऐतिहासिक विजय

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
01st October, 11:07 pm
सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान महामुकाबला

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष क्रिकेट प्रकारात भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. या विजयासोबतच भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इशान किशनच्या धडाकेबाज नाबाद ८० खेळीच्या बळावर भारताने श्रीलंकेसमोर १७० धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या ४५ धावांवर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. भारताचा टी-२० इतिहासातील श्रीलंकेविरुद्धचा हा सर्वांत मोठा विजय ठरला आहे. सुवर्णपदकासाठी भारत पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे.
क्रीडा नगरीत खेळल्या जाणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. सुरुवातीला श्रीलंकेच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताची काहीशी दमछाक झाली. मात्र, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि आक्रमक फलंदाज इशान किशन यांनी डाव सावरत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे गुडघे टेकवावे लागले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. या विजयामुळे भारतीय संघाचा सुवर्णपदक जिंकण्याचा मार्ग सुकर झाला असून, आता अंतिम फेरीत भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे.
भारतीय डावाच्या पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा गोलंदाज थरिंदू रत्नायके याचा एक फुल लेन्थ चेंडू थेट १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या हेल्मेटवर आदळला. वैभवने लेग साईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला असता चेंडूचा संपर्क चुकला आणि तो थेट हेल्मेटवर येऊन थडकला. घटना घडताच भारतीय संघाचा फिजिओ मैदानवर धावला आणि त्यांनी वैभवची तातडीने तपासणी केली. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर वैभवने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले आणि पुन्हा आपला धडाका सुरू ठेवला.
दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान, पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर नवनिदू फर्नांडोने चेंडू हलक्या हाताने खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉईंटवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या रवी बिश्नोईने विलक्षण चपळाई दाखवत चेंडू उचलला आणि स्टंप उडवले. लासिथ क्रूस्पुल्लला खाते न उघडताच तंबूचा रस्ता धरावा लागला.
अनेक मोठे विक्रम प्रस्थापित
भारताचा ११ वा शंभरहून अधिक धावांचा विजय : टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर झाला आहे. भारताने ११ व्या वेळी १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या यादीत कॅनडा १० विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा भारताकडून सर्वात मोठा पराभव : धावांच्या बाबतीत टी-२० प्रकारात श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१७ मध्ये कटक येथे भारताने ९३ धावांनी विजय मिळवला होता.
इशान किशनने मोडला मनिष पांडेचा विक्रम : इशान किशनने ५ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ८० धावांची ऐतिहासिक खेळी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५ व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम मनिष पांडेकडे होता, ज्याने २०१८ मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७९ धावा केल्या होत्या.
श्रीलंकेचा लाजिरवाणा विक्रम : श्रीलंकेचा संघ अवघ्या ४५ धावांवर सर्वबाद झाला. पूर्ण सदस्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा संयुक्तपणे सर्वात निचांकी धावसंख्येचा विक्रम आहे. यापूर्वी २०१९ मध्ये वेस्ट इंडीजचा संघही इंग्लंडविरुद्ध ४५ धावांवर ऑलआऊट झाला होता.
सुरुवातीची पडझड : श्रीलंकेचे पहिले ५ गडी अवघ्या १८ धावांवर माघारी परतले. भारतासमोर टी-२० मध्ये खेळताना कोणत्याही संघाने ५ गडी इतक्या कमी धावसंख्ये गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. २०२२ मध्ये तिरुअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ९ धावांत ५ गडी गमावले होते.
फिरकी गोलंदाजीचे १७ षटके : या सामन्यात श्रीलंका संघाने आपल्या डावात तब्बल १७ षटके फिरकी गोलंदाजांकडून टाकून घेतली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात १७ षटके फिरकी गोलंदाजी टाकली जाण्याची ही तिसरी वेळ आहे. या विक्रमात २०१० मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध १८ षटके फिरकी टाकणारा झिम्बाब्वे संघ प्रथम क्रमांकावर आहे.
वैभव सूर्यवंशीला ‘टाईम’ यादीत स्थान
पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशी ठरला ‘टाईम’ मासिकाच्या मानाच्या यादीत सहभागी
या संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळात १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच त्याला टायमिंग मासिकाच्या प्रतिष्ठित ‘टाइम १०० नेक्स्ट’ या जागतिक उगवत्या ताऱ्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. जगातील विविध क्षेत्रांत वेगाने नाव कमावणाऱ्या उदयोन्मुख व्यक्तींचा गौरव करणारी ही वार्षिक यादी मानली जाते. वैभव या यादीतील सर्वात तरुण खेळाडू ठरला असून, टाईम मासिकाने त्याला क्रीडा जगतातील ‘रायझिंग स्टार’ म्हणून संबोधले आहे. या ७ खेळाडूंच्या जागतिक गटात वैभव हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याच्यासोबत अमेरिकन फुटबॉलपटू आर्चीबाल्ड मॅन्युपिंग, एनबीए खेळाडू टायरेस मॅक्सी, फुटबॉलपटू नोमी गिरामा व फोलारिन बालोगून, टेनिसपटू अलेक्झांड्रा एला आणि बास्केटबॉलपटू ओलिवा माईल्स यांचा समावेश आहे.
आता लक्ष्य सुवर्णपदक
भारतीय क्रिकेट संघ सध्या एका नव्या संक्रमणातून जात असून, युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या सुवर्णमिश्रणामुळे संघ जागतिक स्तरावर नवनवीन शिखरे सर करत आहे. इशान किशनची संयमी व आक्रमक खेळी, गोलंदाजांची घातक कामगिरी आणि वैभव सूर्यवंशीसारख्या युवा प्रतिभेचा उदय हे भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देतात. आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीलंकेला लीलया पराभूत केल्यानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यावर लागले असून, भारताचे सुवर्णपदक राखण्याचे स्वप्न पूर्ण होणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे डोळे लागले आहेत.