म्युटेशन : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलावली मामलेदारांची तातडीची बैठक

‘गोवन वार्ता’च्या व्हिडिओनंतर पहिली बैठक, म्युटेशन अर्जांची मागवली माहिती : दक्षिण गोवा जिल्ह्यातील मामलेदार आणि संयुक्त मामलेदार कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेली म्युटेशन प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी तातडीचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, सर्व मामलेदार आणि संयुक्त मामलेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी कार्यालयात उपस्थित राहून फॉर्म XIII अंतर्गत आलेल्या सर्व म्युटेशन प्रकरणांचा तपशील घेऊन येण्याचे निर्देश दिले आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
म्युटेशन : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आज बोलावली मामलेदारांची तातडीची बैठक

मडगाव : दक्षिण गोवा जिल्ह्यातील मामलेदार आणि संयुक्त मामलेदार कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेली म्युटेशन प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी तातडीचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, सर्व मामलेदार आणि संयुक्त मामलेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी कार्यालयात उपस्थित राहून फॉर्म XIII अंतर्गत आलेल्या सर्व म्युटेशन प्रकरणांचा तपशील घेऊन येण्याचे निर्देश दिले आहेत. 



‘गोवन वार्ता’ने प्रलंबित प्रकरणांबाबत व्हिडिओ जारी करून तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आज तातडीने सर्व मामलेदारांची दुपारी बैठक बोलावली आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (South Goa District Collector & District Magistrate) प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्यानंतर त्यासंबंधीचा अनुपालन अहवाल सोमवार, १९ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक केले आहे.




दक्षिण गोवा वकील संघटनेने फेरफार आणि जमिनीच्या वाटणीसंबंधीच्या प्रकरणांतील विलंब, हरवलेल्या फाईल्स आणि कथित भ्रष्टाचाराबाबत उपस्थित केलेल्या तक्रारीनंतर सासष्टीतील मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

दरम्यान आज जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी इतर चालू प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, तसेच उर्वरित प्रलंबित प्रकरणे २४ ऑक्टोबर रोजी निकाली काढण्यासाठी हाती घ्यावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान उत्तर गोवा आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी अद्याप कार्यवाही हाती घेतलेली नाही. 

हेही वाचा
सर्व पहा