बेकायदेशीर सनद घेणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; नगरविकास मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मडगाव येथील रविद्र भवनात पार पडलेल्या 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमात नागरिकांनी गृहआधार, सांडपाणी आणि प्रलंबित सुनावण्यांबाबत तक्रारी मांडल्या. त्यावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तातडीने पाहणी करून समस्या सोडवण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
बेकायदेशीर सनद घेणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; नगरविकास मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मडगाव: मडगावच्या रवींद्र भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या 'सरकार तुमच्या दारी' या विशेष उपक्रमात नागरिकांनी गृहआधार योजनेतील अडचणी, पालिकेकडील प्रलंबित सुनावण्या, खुल्या जागांमधील बेकायदेशीर प्लॉटिंग आणि सांडपाण्याच्या गंभीर समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या तक्रारींची दखल घेत नगरविकास व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करून प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः पालिकेकडे महिनोनमहिने प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये सुनावणी दरम्यान आठ दिवसांच्या आत जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे स्पष्ट आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले जातील, असे त्यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमाला मंत्री विश्वजीत राणे यांच्यासोबत आरोग्य खात्याचे सचिव यतींद्र मरळकर, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ॲग्ना क्लीटस, पालिका मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी व विविध सरकारी विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी गृहआधार योजना आणि इतर उपक्रमांसाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी मांडल्या. याशिवाय पालिका क्षेत्रातील प्रकरणांची सुनावणी वेळेत होत नसल्याने होणाऱ्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर बोलताना कोणत्याही पालिका क्षेत्रात प्रकरणांवर सुनावणी सुरू असल्यास सात ते आठ दिवसांत पाहणी होणे अनिवार्य आहे आणि त्याबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या जात असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमप्रसंगी महिला बचत गटांसाठी पालिका क्षेत्रात जीसुडा किंवा इतर विभागांमार्फत योग्य जागेची उपलब्धता आणि आर्थिक सहकार्य देण्याची मागणी करण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील सुविधांवर बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, तेथे कॅथ लॅब सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली असून सध्या एमआरआय व इकोकार्डिओग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नावेली आरोग्य केंद्रातील विषय आणि एका ऑटिझमग्रस्त बालकाच्या उपचारातील अडचणींवर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून विशेष मुलांना योग्य सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कोमुनिदादच्या जागेतील 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रश्नांवरही या वेळी सविस्तर चर्चा झाली. खुल्या जागेत बेकायदेशीर सनद घेतलेल्या कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही आणि अशा प्रकारे बेकायदेशीर सनद घेणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राणे यांनी नमूद केले. याशिवाय कोंब-मडगाव येथील सांडपाणी वाहण्याच्या समस्येवर तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ॲग्ना क्लीटस यांच्यामार्फत पालिका व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरविकास खात्याकडून सर्व तक्रारींचे निवारण करण्यावर भर दिला जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.


हेही वाचा
सर्व पहा