ताळगावच्या नागाळी हिल्स येथे क्षुल्लक वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला; चार संशयितांना अटक

ताळगावच्या नागाळी हिल्स येथे क्षुल्लक वादातून दोघा तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला; बिहारच्या चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
ताळगावच्या नागाळी हिल्स येथे क्षुल्लक वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला; चार संशयितांना अटक

पणजी: ताळगाव येथील नागाळी हिल्स परिसरात गुरुवारी रात्री क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोघा तरुणांवर कोयता आणि लाकडी दंडुक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या हल्ल्यात अंकित आणि डॅनिएल हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील जीएमसीत उपचार सुरू आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पणजी पोलिसांनी अत्यंत तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासांतच मूळ बिहारच्या चार संशयित कामगारांना शुक्रवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत. फूलचंद साहनी (३५), संजीव कुमार साहनी (१८), सुजीत कुमार साहनी (४०) आणि नितीश कुमार साहनी (१९) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

 याप्रकरणी सागर कदम या तरुणाने रीतसर तक्रार नोंदवली आहे. गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार सागर आणि त्याचे दोघे मित्र नागाळी हिल्स परिसरात गेले होते. तेथे असलेल्या चार अनोळखी कामगारांशी त्यांचा  शाब्दिक वाद झाला. पाहाता पाहाता हा वाद विकोपाला गेला आणि चारही संशयितांनी चिडून तक्रारदाराचा मित्र अंकित याच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केला. त्यासोबतच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॅनिएल या दुसऱ्या मित्राच्या हातावरही कोयता मारून त्याला गंभीररीत्या जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, दोन्ही जखमी मित्र जीव वाचवण्यासाठी पळत असताना संशयितांनी त्यांचा पाठलाग करत लाकडी दंडुक्यांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

हल्ल्यानंतर दोन्ही जखमी तरुणांना तातडीने बांबोळी येथील जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले व सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक दिपेश शेटकर व पथकाने तपासाला गती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. तांत्रिक तपास आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपेश शेटकर पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा