पणजी: कदंब वाहतूक महामंडळाने (Kadamba Transport Corporation Ltd) केलेल्या नव्या ॲप आधारित तिकीट यंत्रणेला विरोध करीत, ही यंत्रणा लागू करण्यासंदर्भातील जारी केलेले परिपत्रक मागे घेण्याच्या मागणीसाठी कदंब कर्मचाऱ्यांनी १२ नोव्हेंबरला गोवाभर एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाची नोटीस कदंब महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री आणि मुख्य सचिव यांना पाठवण्यात आल्याची माहिती आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली.
नव्या तिकीट यंत्रणेमुळे चालक आणि कंडक्टरना त्रास होतो आणि कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्याची शक्यता वाढते, असा आरोप फोन्सेका यांनी आयटकच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी कदंब कर्मचारी संघटनेचे नेते उपस्थित होते. या यंत्रणेतून दिलेल्या तिकीटांचा आणि त्या पैशांचा हिशोब कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे कळत नाही.
पूर्वी किरकोळ हिशोबात तफावत असल्यास ती समजून घेऊन दुरुस्त करण्याची पद्धत होती; पण आता केवळ ५ रुपयांची तफावत असली तरी कर्मचाऱ्यांना दंड आकारण्याची कारवाई होते, असा आरोप त्यांनी केला. वाहकांना १०० रुपये ते ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची पद्धत बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच कदंबच्या ताफ्यात ३०० डिझेल बसगाड्या तातडीने दाखल करून घेण्याचे आश्वासन पाळण्याची मागणी त्यांनी केली. सुमारे २५० बसगाड्या भंगारात काढल्यानंतर नव्या बसगाड्या घेतल्या नाही आणि विजेवरील बसगाड्या बंद पडतात असा त्यांचा दावा आहे.
कर्मचाऱ्यांचे सातव्या आयोगाचे वेतन तसेच थकबाकी देणे, ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या पीएफ थकबाकीचा प्रश्न सोडवणे तसेच कंत्राटी बसगाड्या चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणे, आणि देखरेख कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे; या मागण्या त्यांनी केल्या. दोन कोटी रुपयांची बस चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेश स्तरावर किमान ३५ हजार रुपये वेतन देण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांचा मान राखणे आणि व्यवस्थापनाकडून होणारा कथित छळ बंद करणे, या उद्देशाने संप पुकारल्याचे फोन्सेका यांनी स्पष्ट केले.


