पणजी : तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभारण्यात येणार होती. येथे ग्रीनफिल्ड इलेक्ट्रॉनिकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होणार होते. यासाठी सरकारने अल्वारा जमीन ताब्यात घेतली . मात्र अद्याप येथे एकही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू झालेली नाही. आता या ठिकाणी बांधकाम कचरा प्रकल्प आणि आयटी कन्व्हेन्शन सेंटर उभा करण्याचा विचार आहे. येथील स्थानिकांना हे दोन्हीही प्रकल्प नको आहेत. त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक सिटी पूर्ण करून स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे; अशी मागणी तुये नागरिक समितीतर्फे करण्यात आली.
शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे तुळशीदास राऊत यांनी सांगितले की, तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २०१६ मध्ये झाली होती. मात्र यानंतर येथे अद्याप एकही फॅक्टरी आलेली नाही. येथील २.५ लाख चौमी संपादित जमिनीवर कोणतीही इमारत उभारलेली नाही.
प्रस्तावित कन्वेंशन सेंटरचा आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचा काहीही संबंध नाही. कन्वेंशन सेंटर हे आदरतिथ्य क्षेत्राशी निगडित आहे. येथे कसलेही मॅन्युफॅक्चरिंग होणार नाही. असे असताना येथे कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचे काय कारण आहे हे सरकारने स्पष्ट करावे.
ते म्हणाले, यशियाव येथे आता बांधकाम कचरा प्रकल्प आणण्याचा विचार देखील सुरू आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या जवळच शाळा आणि चर्च आहे. भविष्यात या कचऱ्यामुळे दोन्ही संस्थांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र नेणे आवश्यक आहे. याशिवाय येथे सीआयएसएफसाठी केंद्र उभारण्यात येणार आहे.
तिथे ५ हजार कर्मचारी असतील. मात्र यामुळे येथील वीज, पाणी अशा पायाभूत सुविधांवर ताण येणार आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ४ हजार असताना बाहेरून ५ हजार लोक येथे आणणे योग्य नाही. यामुळे सीआयएसएफ केंद्राला देखील आम्ही विरोध केला आहे.


