पेडणे : ‘माझे घर’ योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई किंवा अडथळे निर्माण करणाऱ्या पंचायत सचिवांवर आठ दिवसांत निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chier Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिला.
पेडणे येथे आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमादरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी हा इशारा दिला. मामलेदार कार्यालयाऐवजी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक प्रमाणपत्र जारी झाल्यानंतरही ‘माझे घर’ योजनेची प्रक्रिया लांबवली किंवा त्यात अडथळे आणले, तर संबंधित पंचायत सचिवांना निलंबित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘माझे घर’ योजनेचा लाभ पात्र नागरिकांना वेळेत मिळावा आणि प्रशासकीय स्तरावर अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी सरकार गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून स्पष्ट झाले. योजनेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा संदेशही त्यांनी दिला. या वेळी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित होते.


