मडगाव : बुलबल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेन, बेल्जियम, चिली आणि स्वित्झर्लंड यांच्या सहनिर्मितीतील ‘ऑलिव्हिया अँड द इन्व्हिजिबल अर्थक्वेक’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला, तर दक्षिण कोरियाच्या ‘स्पीडी’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्राप्त झाला.
मडगाव येथे आयोजित बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभीर हेदे उपस्थित होते.
फीचर फिल्म्स श्रेणीत दिग्दर्शिका आयरीन इबोरा रिझो यांच्या ऑलिव्हिया अँड द इन्व्हिजिबल अर्थक्वेक या चित्रपटाला सुवर्ण बुलबुल ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि तीन लाखांचे पारितोषिक मिळाले. इटलीच्या मारिनिटा स्पॅम्पिनाटो यांना स्वीटहार्ट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रजत बुलबुल पुरस्कार आणि एक लाखाचे पारितोषिक मिळाले आहे. माऊस या अमेरिकी चित्रपटातील अभिनयासाठी कॅथरीन मॅलन कुप्फरर हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा सुवर्ण बुलबुल पुरस्कार जाहीर झाला. याच विभागात मेक्सिको आणि स्पेनच्या संयुक्त निर्मितीतील रॉड्रिगो प्ला दिग्दर्शित द न्यूकमर्स या चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार मिळाला. चिलीच्या गॅब्रिएल ओसोरिओ वर्गीस दिग्दर्शित ब्रेव्ह कॅट या चित्रपटाला विशेष उल्लेखाने गौरविण्यात आले.
लघुपटांच्या विभागात दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक ओ जीइन यांच्या स्पीडी या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला. या चित्रपटाला सुवर्ण बुलबुल ट्रॉफी आणि एक लाखांचे पारितोषिक देण्यात आले. चीनच्या सोलो या लघुपटासाठी युआंग झोंग यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रजत बुलबुल पुरस्कार आणि ५० हजारांचे पारितोषिक मिळाले.
नेदरलँड्सच्या जर्न लीउवेरिंक दिग्दर्शित डॉग ब्रिज या लघुपटाला विशेष परीक्षक पुरस्कार, तर सेनेगल, फ्रान्स आणि मोरोक्को यांच्या संयुक्त निर्मितीतील डोन्ट वेक अप द स्लीपिंग चाइल्ड या लघुपटाला विशेष उल्लेख मिळाला. विविध देशांतील चित्रपटांना एकाच व्यासपीठावर आणणार्या या महोत्सवात फीचर फिल्म्स आणि लघुपटांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कलाकृतींचा गौरव करण्यात आला.
भारतीय चित्रपट ‘कट्टी’चा गौरव
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय चित्रपटानेही छाप उमटवली. कनिष्क अग्रवाल दिग्दर्शित ‘कट्टी’ (अनफ्रेंड) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. कनिष्क अग्रवाल यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला व हा त्यांच्यासह टीमने केलेल्या अथक प्रयत्नांचा सन्मान असून यातून नव्याने काम करण्याची प्रेरणा प्राप्त झाल्याचे सांगितले.
पालकांना विसरू नका : मंत्री कामत
मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, बुलबुल चित्रपट महोत्सवाची चौथ्या आवृत्तीचा समारोप होत असून पाचवा महोत्सव याच ठिकाणी पुढील वर्षी होईल. या महोत्सवाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनाही मुलांचा उत्साह पाहून आनंद झाला. महोत्सवात मुलांसह पालकांसाठी कार्यक्रम आयोजित केलेले होते. हा महोत्सव देशातील प्रीमीअर फिल्म फेस्टीवल व्हावा व यातून मुलांनी कला आत्मसात करुन नवसंकल्पना साकाराव्यात, यातच महोत्सवाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळेल. मुलांनी मोठे व्हावे, पण आपल्या पालकांना विसरू नये, असेही मंत्री कामत यांनी सांगितले.


