मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचेच सरकार : विश्वजीत राणे

गोव्यात पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आहे, असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री विश्वज‍ीत राणे यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्र्यांच्याच सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याचे रक्षण करण्यासाठी रोडमॅप तयार करण्याची गरज आहे; रस्त्यावर फिरल्याने गोव्याचे रक्षण होणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला


16th October, 11:59 pm
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचेच सरकार : विश्वजीत राणे

कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री दिगंबर कामत, मंत्री विश्वजीत राणे व इतर.
..
गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
गोव्यात पुन्हा डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आहे, असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री विश्वज‍ीत राणे यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्र्यांच्याच सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याचे रक्षण करण्यासाठी रोडमॅप तयार करण्याची गरज आहे; रस्त्यावर फिरल्याने गोव्याचे रक्षण होणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत एमआरआय, इको तसेच हृदयरोग आणि मूत्रपिंडविकार उपचार विभागांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्यमंत्री बोलत होते. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सेवा सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय रुग्णालयात अस्थिरोग आणि मज्जासंस्थेवरील उपचारांसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी साधारणत: पुढील तीन महिन्यांत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. इस्पितळातील आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करून सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य खाते पाच ते सहा सर्वसमावेशक प्रस्तावांवर काम करत आहे. काही गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागतो. इतकी वर्षे नव्या सुविधा देण्यासाठी आपल्या हातात काहीच नव्हते, आता मुख्यमंत्री सावंत यांनी कामांना मंजुरी दिली आहे. आता थोड्या प्रमाणात कामांना सुरुवात झाली आहे.
दर्जेदार, परवडणार्‍या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर
दक्षिण गोव्यातील रुग्णांना तपासण्या आणि विशेष उपचारांसाठी गोमेकॉत जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे रुग्णांचा वेळ वाचेल आणि गैरसोय दूर होईल. दक्षिण गोव्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि परवडणार्‍या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. हे इस्पितळ टर्शरी स्तरावर आणण्याचे प्रयत्न आहेत. जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या टीकेला जागा उरणार नाही, असा दावाही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.                  

हेही वाचा
सर्व पहा