बायणा समुद्रकिनारा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव रद्द

बायणा समुद्रकिनाऱ्याचा सुमारे १ किलोमीटरचा पट्टा वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित उपक्रमांसाठी दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लीज) देण्याच्या प्रस्तावाला लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि स्थानिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर, मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) आपली निविदा मागे घेतली आहे.


16th October, 11:54 pm
बायणा समुद्रकिनारा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव रद्द

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
बायणा समुद्रकिनाऱ्याचा सुमारे १ किलोमीटरचा पट्टा वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित उपक्रमांसाठी दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लीज) देण्याच्या प्रस्तावाला लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि स्थानिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर, मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) आपली निविदा मागे घेतली आहे.
एमपीएच्या अभियांत्रिकी नागरी विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकात, सुमारे १ किलोमीटर लांबीचा बायणा समुद्रकिनाऱ्याचा भाग ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव तातडीने मागे घेण्यात येत आहे, असे स्पष्ट केले आहे. हे शुद्धीपत्रक अधीक्षक अभियंता (इस्टेट) यांनी जारी केले आहे.
प्रस्तावित भाडेतत्त्वाच्या विरोधात वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे समुद्रकिनाऱ्यावर लोकांच्या मुक्त प्रवेशावर मर्यादा येतील, तसेच पारंपरिक मच्छीमार, स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक, शॅक व्यावसायिक आणि या समुद्रकिनाऱ्यावर उपजीविका अवलंबून असलेल्या इतर स्थानिक घटकांच्या रोजगारावर गदा येईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती.
निविदेनुसार, या प्रकल्पाचा उद्देश समुद्रकिनाऱ्यावर कायदेशीर परवानगी असलेले व्यावसायिक उपक्रम सुरू करणे हा होता. यामध्ये वॉटर स्पोर्ट्स, सागरी पर्यटन, प्रीमियम पर्यटन, पर्यावरणपूरक पर्यटन आणि साहसी पर्यटनाचा समावेश होता. तसेच जेट सर्फिंग आणि आलिशान यॉट चालवणे यांसारख्या उपक्रमांचाही यात समावेश करण्यात आला होता.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. हा प्रस्ताव स्थानिकांना अडचणीत आणणारा आहे. यामुळे मच्छीमार, वॉटर स्पोर्ट्स आणि शॅक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार होते. हा प्रस्ताव पुढे नेला, तर मोठ्या प्रमाणावर लोकआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
खासदार विरियातो फर्नांडिस यांनीही या प्रस्तावाला विरोध केला होता. समुद्रकिनाऱ्यांचे खाजगीकरण खपवून घेणार नाही. समुद्रकिनाऱ्यांवर लोकांचा असलेला मुक्त वावर धोक्यात आणणाऱ्या प्रयत्नाला विरोध केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते.
‘गोंयच्या रापणकारांचो एकवट’चे नेते ऑलेंसियो सिमोईस यांनीही इशारा दिला होता की, हा प्रस्ताव पुढे गेल्यास मोठे आंदोलन होईल. गोव्यातील मच्छीमार एमपीएवर मोर्चा काढतील आणि विरोध दर्शवण्यासाठी बंदराचे कामकाज रोखतील.

हेही वाचा
सर्व पहा