पणजी : एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) पणजी येथील आपल्या मल्टिप्लेक्स प्रांगणात ‘आर्ट कॅफे’ आणि सांस्कृतिक तसेच सर्जनशील केंद्र उभारणी, संचालन व देखभालीसाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. खाद्यसेवांसह कला, सिनेमा, साहित्य आणि समुदाय उपक्रमांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ईएसजीने जाहीर केलेल्या तीन वर्षांच्या प्रस्तावित कंत्राटानुसार, निवडलेली एजन्सी या जागेची रचना तयार करून कॅफे उभारणार आहे. दैनंदिन व्यवस्थापन व देखभालीची जबाबदारीही कंत्राटदार सांभाळणार आहे. हे ठिकाण केवळ एका साध्या कॅफेपुरते मर्यादित न राहता येथे कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि ईएसजीद्वारे आयोजित इतर कार्यक्रमांच्या वेळी या एजन्सीला विशेष उपक्रमांचे आयोजन करावे लागेल. यामध्ये कला प्रदर्शने, चित्रपट स्क्रीनिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.
खर्च, जबाबदारी खासगी एजन्सीची
कॅफे आणि सांस्कृतिक केंद्राच्या अंतर्गत सजावटीचा खर्च, फर्निचर, स्वयंपाकघर (किचन) उभारणी, उपकरणे, रोषणाई आणि डिझाइनचा पूर्ण खर्च संबंधित एजन्सीलाच करावा लागेल. याशिवाय आवश्यक परवानग्या (लायसन्स) मिळवणे, स्वच्छता राखणे, कचरा व्यवस्थापन तसेच वीज आणि पाण्याचे बिल भरण्याची जबाबदारीही एजन्सीचीच असणार आहे.
वेळ, कंत्राटाच्या अटी
- हे केंद्र रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहील. ईएसजीच्या पूर्वपरवानगीने गरजेनुसार वेळेत वाढ करता येऊ शकेल. मोठ्या कार्यक्रमांदरम्यान एजन्सीला ईएसजीसोबत समन्वय ठेवून जाहिरात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
- हे कंत्राट ३ वर्षांच्या कालावधीसाठी असेल आणि अटींच्या अधीन राहून ईएसजीच्या निर्णयानुसार मुदत वाढवली जाऊ शकते. निवडलेल्या एजन्सीला दरमहा परवाना शुल्क (लायसन्स फी) द्यावे लागेल, ज्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ होईल.
- या उपक्रमाद्वारे मल्टिप्लेक्स प्रांगणाचा अधिक प्रभावी वापर करणे, सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना व्यासपीठ मिळवून देणे आणि संस्थेच्या जागेतून महसूल मिळवणे असा ईएसजीचा प्रयत्न आहे. दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी एजन्सीकडे असली, तरी संपूर्ण परिसरावर आणि उपक्रमांवर ईएसजीचेच नियंत्रण राहील.


