केपे : केपे पोलीस (Quepem Police) स्थानक हद्दितून अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीला कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथून शोधून गोव्यात आणले. नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आधुनिक माहिती संकलन पद्धतींसह पारंपरिक तपास तंत्रांचाही वापर केला. या प्रयत्नांतून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलीस अर्सिकेरे येथे गेले. सोबत मुलीच्या कुटुंबातील एका सदस्यालाही नेण्यात आले.
प्रथम हुबळी येथे जाऊन माहिती गोळा केली. रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले आणि विक्रेत्यांच्या मदतीने मुलीचा शोध घेण्याची रणनीती आखण्यात आली. मुलीचे छायाचित्र हुबळी ते म्हैसूर मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांशी संबंधित फेरीवाले आणि विक्रेत्यांना पाठवण्यात आले. त्याठिकाणी शोध घेतल्यानंतर मुलगी सापडली. त्यानंतर तिला गोव्यात आणण्यात आले.
हैद्राबाद येथे जाऊन मुलीची माहिती मिळवण्यात पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेटकर, सिद्धू राऊळ, अरबाज खान, प्रज्वल नाईक यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई आणि केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक दीपा देईकर करीत आहेत.
गोवा पोलीस (Goa Police) आणि कर्नाटक पोलीस (Karnataka Police) यांचा समन्वय आणि स्थानिक नगारिकांच्या सहकार्यामुळे या प्रकरणाचा यशस्वी तपास करणे शक्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


